जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:16+5:302021-03-06T04:13:16+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने ४ ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने ४ मार्च रोजी मंत्रालयात उच्चाधिकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गर्ल्स हायस्कूल येथील खुल्या जागेवर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे ५८ कोटी ६८ लाख रुपयांचा आराखडा तयार करून हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. या प्रस्तावात प्रारंभी शासनस्तरावरून त्रुटी काढण्यात आल्या होत्या. या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बांधकाम विभागाला दिले होते. बांधकाम विभागाने त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व धारणी, दर्यापूर, अमरावती, भातकुली या पंचायत समित्यांच्या इमारतींकरिता पदाधिकारी व पालकमंत्री यांनी सातत्याने शासनदरबारी हा मुद्दा रेटून धरला आहे. अशातच शासनाने जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव हा १५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा असल्याने या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ४ मार्च रोजी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी या प्रस्तावावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
बैठकीला राज्याच्या बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य वास्तुविशारद, वित्त सचिव तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता निला वंजारी, अभियंता राजेश लाहोरे आदी उपस्थित होते. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत नवीन प्रशासकीय इमारतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आता हा प्रस्ताव ग्रामविकास विभाग,त्यानंतर नियोजन विभाग येथून वित्त विभागाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.