विदर्भपंढरीत भाविकांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:30 PM2018-07-23T23:30:28+5:302018-07-23T23:31:02+5:30
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले.... आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले.... तुझ्या भक्तीचा झरा वाहू दे... पांडुरंगा, माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा :
भक्तीच्या वाटेवर
गाव तुझे लागले....
आशीर्वाद घेण्यास
मन माझे थांबले....
तुझ्या भक्तीचा झरा वाहू दे...
पांडुरंगा, माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे...
विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रचलित कौंडण्यपूर येथे पांडुरंगाच्या सहवासाची, दर्शनाची आस लागलेल्या भक्तांनी दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासून रांग लावली होती. सायंकाळपर्यंत सुमारे १५ हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन या माउलीचे रूप डोळ्यांत साठवले.
देवी रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर येथे वर्षभर भाविकांची गर्दी राहते. पंढरपूरचे प्रतिरूप असे कौंडण्यपूरला म्हटले जाते. पंढरपूरला पायी जाणारी राज्यातील सर्वांत पहिली पालखी येथील असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दिंडीसोबत जातात. पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना प्रतिपंढरपूरला ओढ असते. त्यामुळे वशिष्ठा (वर्धा) नदीच्या काठावरील अतिप्राचीन मंगळवारी पहाटेपासून गजबजले होते. भाविकांची गर्दी सहा दिवस कायम राहणार आहे.
कौंडण्यपूरला आषाढी एकादशीची महापूजा सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. पहिल्या पूजेचा मान आर्वी येथील सत्यनारायण चांडक व अमरावती येथील गुल्हाने दाम्पत्याला मिळाला. यावेळी पुजारी, मंदिर संस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व भाविक उपस्थित होते.
मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी होती. यावेळी मंदिरात लगतच्या गावांतील महिला व पुरुषांची भजनी मंडळांनी गीत व भजन गायन केले. बेनोडा येथील वारकरी पालखी भजनी मंडळ, आर्वी येथील शीतलामाता भजनी मंडळ, अंजनसिंगी येथील कान्होजी महाराज भजनी मंडळ आदी सर्व मंडळांच्या भजनांमुळे भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली. या सर्व भजनी मंडळांचे संस्थानच्यावतीने स्वागत करण्यात आले, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक काळे यांनी दिली.
कुऱ्हाचे ठाणेदार सुनील किनगे, पीएसआय नंदा वैश्य, आशिष चौधरी, मंगेश पेठे, कॉन्स्टेबल हनुुमानसिंग ठाकूर, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सर्व भाविकांना पूजेचा मान असणाऱ्या परिवाराद्वारा फराळाचे वाटप करण्यात आले.
नौकाविहाराचा आनंद
भाविकांनी वर्धा नदीत स्नान केले तसेच नौकाविहाराचा आनंद लुटला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीतीरावर सुरक्षा ठेवण्यात आली होती.
दहीहंडीने समाप्ती
आषाढी एकादशीच्या यात्रेची समाप्ती पाडव्याला २८ जुलै रोजी काल्याचे कीर्तन व गोकुळपुरीत ४.३० वाजता दहीहंडी होणार आहे. या दहीहंडीला विदर्भातून सात ते आठ हजार भाविक वारकरी उपस्थित राहतील.