माेघे अविरोध, पुरकेंची माघार; हर्षवर्धन देशमुख रिंगणात अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुकीत २०६ उमेदवार
By गणेश वासनिक | Published: November 5, 2022 07:23 PM2022-11-05T19:23:36+5:302022-11-05T19:23:36+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीत माजी मंत्र्यांचे उमेदवारी अर्ज असल्याने ही निवडणूक रंगणार आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीत माजी मंत्र्यांचे उमेदवारी अर्ज असल्याने ही निवडणूक रंगणार आहे. शुक्रवारी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माजी मंत्री शिवाजीराव मोघे अविरोध झाले आहेत. तर माजी मंत्री तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची उमेदवारी कायम असल्याने सिनेटची निवडणूक चांगलीच गाजणार आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरचा दिवस होता. त्यानुसार सिनेट निवडणुकीत २०६ उमेदवार रिंगणात असणार
आहे. २० नोव्हेबर रोजी सकाळी ७ ते ५ या कालावधीत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यात ६३ मतदान केंद्र असणार आहे. आतापर्यंत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर २०६ जण रिंगणात आहे. परंतु, यावेळी माजी मंत्र्यांनी सिनेट सदस्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढणार आहे. शिवाजीराव मोघे हे संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातून अविरोध आलेत. प्रा. वसंत पुरके यांचाही उमेदवारी अर्ज होता. मात्र, कॉंग्रेसचे दोन तुल्यबळ नेते सिनेटच्या एसटी प्रवर्गातून एका जागेसाठी आमने-सामने उभे ठाकणार होते. मात्र, प्रा. पुरकेंनी माघार घेतली आणि मोघेंच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
असे आहेत प्रवर्गनिहाय २०६ उमेदवार
- प्राचार्य : १९
- संस्था चालकांचेे प्रतिनिधी: ११
-दहा शिक्षक: ३१
- विद्यापीठ शिक्षक:४
- नोंदणी पदवीधर : ३५
-विद्वत परिषद :१२
- परीक्षा मंडळ : ९४
‘शिवाजी’नंतर भैय्यासाहेबांची सिनेटवर नजर
राज्यात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी संस्था चालकांचे प्रतिनिधीसाठी सिनेट निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. खुल्या प्रवर्गातून सिनेट सदस्यासाठी भैय्यासाहेब यांची उमेदवारी असल्याने यंदा सिनेट निवडणूक रंगणार आहे. संस्था चालकांचे चार प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातून निवडले जातील. हर्षवर्धन देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेनंतर आता सिनेटवर नजर रोखली आहे. चार जागांसाठी हर्षवर्धन देशमुख यांच्यासह डॉ. नरेंद्र बोबडे, हरीश बोचरे, डॉ. अशोक चव्हाण,राम देवरसकर, रविशंकर धांडे, ठाकुरदास मालाणी, यदुराज मेटकर, ॲड. मोतीसिंह मोहता, डॉ. भीमराव वाघमारे असे दहा उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे.