स्वच्छतेसाठी विशिष्ट कंपनीवर मेहेरनजर !
By admin | Published: June 20, 2017 12:02 AM2017-06-20T00:02:52+5:302017-06-20T00:02:52+5:30
शहराच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय कंत्राटदार न नेमता ते कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याच्या प्रस्तावाला स्थायीने हिरवी झेंडी दिली आहे.
होमवर्कसाठी ‘त्या’ कंपनीची मदत : विरोध वाढला, केंद्रीय पद्धतीने कंत्राट
प्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय कंत्राटदार न नेमता ते कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याच्या प्रस्तावाला स्थायीने हिरवी झेंडी दिली आहे. तथापि स्थायीच्या निर्णयाला भाजप नगरसेवकांचाच विरोध असल्याने ‘तुषार भारतीय वर्सेस आॅल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा ‘मल्टिनॅशनल कंपनी’चा मुद्दा समोर आला असून एका विशिष्ट कंपनीसाठी ‘रेडकार्पेट’ अंथरले गेल्याचे चित्र आहे.
तूर्तास ४३ प्रभागात ४३ कंत्राटदार कार्यरत आहेत. याशिवाय शहरातील बाजारांच्या स्वच्छतेची जबाबदारी अन्य कंत्राटदारांवर आहे. या कंत्राटाची मुदत संपल्याने २२ प्रभागांसाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली. मात्र, सत्तास्थानी भाजप विराजमान झाल्यानंतर स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कंत्राटदार न नेमता संपूर्ण शहरासाठी एकाच मल्टिनॅशनल कंपनीला पाचारण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. ११ मे रोजी झालेल्या स्थायीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून पुढील कारवाईसाठी तो प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला भाजपकडून नव्हे तर विरोधी पक्षाकडूनही जोरदार विरोध झाला. त्यामुळे स्थायी समिती बॅकफुटवर आली. मात्र, इंदोर दौऱ्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीच्या कंत्राटाच्या मुद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मागील दोन महिन्यांपासून मल्टिनॅशनल कंपनीबाबतच्या प्रस्तावाचे होमवर्क स्थायी आणि प्रशासनाकडून केले जात आहे. इंग्रजी वर्णमालेतील तीन अक्षरे मिळून असलेल्या एका कंपनीसाठी हा घाट रचला जात असल्याच्या आरोपाला या होमवर्कमुळे बळ मिळाले आहे.
‘त्या’ कंपनीकडून होमवर्क !
अमरावती : या कंत्राटाची संपूर्ण पूर्वतयारी या कंपनीकडून करवून घेतली जात असल्याने स्वत:ला पोषक ठरणाऱ्या अटी-शर्तींचा समावेश ही कंपनी करेल. सत्ताधिशांमधील काहींचा इंटरेस्ट या कंपनीबाबत जगजाहीर असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच याविशिष्ट कंपनीसाठी रेडकार्पेट अंथरले गेले आहे. वर्षाकाठी ४० ते ४५ कोटींचा हा प्रस्ताव ५ वर्षांसाठी २०० कोटींच्या घरात जात असल्याने यात कोट्यवधींचे अर्थकारण साधले जाणार आहे. अमरावती शहराची स्वच्छता करण्यास इंटरेस्टेड असलेल्या एका विशिष्ट कंपनीला मनपा प्रशासन आणि एका पदाधिकाऱ्याकडून झुकते माप दिले जात आहे. ‘वन मॅन कॉन्ट्रॅक्टरशिप’चे टेन्डर डॉक्युमेंट कसे असावेत, यांसह निविदांमध्ये कोणत्या अटी-शर्ती घालायच्या याचे ‘होमवर्क’ ती विशिष्ट कंपनीच करते आहे.
‘त्या’ विशिष्ट कंपनीसाठीच घाट
स्थायी समिती सभापती तुषार भारतीय केंद्रीय पद्धतीच्या कंत्राटासाठी आग्रही आहेत. याबाबतचा त्यांचा ‘इंटरेस्ट’ जगजाहीर आहे. तथापि, निविदा भरणाऱ्या आणि कॉमिट करणाऱ्या कंपनीकडून कंत्राटाचे होमवर्क केले जात आहे. त्यासाठी बैठकींचे सत्र वाढले असताना ‘त्या’ विशिष्ट कंपनीसाठी या नव्या कंत्राटाचा ‘घाट’ रचला जात असल्याचे उघड झाले आहे.
कंत्राटाबाबतच्या अटी-शर्ती स्थायी समितीच्या पुढील बैठकीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीला दैनंदिन साफसफाईचे कंत्राट देण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया करण्यात येईल.
- तुषार भारतीय,
सभापती, स्थायी समिती
स्थायी समितीने याबाबत अटी, शर्तीसह सर्वसमावेशक प्रस्ताव ठेवण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. दैनंदिन साफसफाईच्या कंत्राटाबाबत त्यानंतर प्रशासनाच्यावतीने उचित निर्णय घेण्यात येईल.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका