विश्वासावर चालणारी मेळघाटातील आगळी बँक !
By admin | Published: March 18, 2017 12:01 AM2017-03-18T00:01:40+5:302017-03-18T00:01:40+5:30
मेळघाटातील प्रत्येक आदिवासी परंपरेत काही ना काही बोध घेण्यासारखे असते.
गावपंचायतीची व्यवस्था, आज होणार ताळेबंद सादर
श्यामकांत पाण्डेय धारणी
मेळघाटातील प्रत्येक आदिवासी परंपरेत काही ना काही बोध घेण्यासारखे असते. अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे होळी सणादरम्यान पाहायला मिळणारी गावपंचायतीची बँक व्यवस्था. दरवर्षी रंगपंचमी दरम्यान आपापल्या सोयीनुसार गावपंचायत बसविण्यात येते. यामध्ये गरजुंना वाटण्यात आलेल्या कर्जाची व्याजासह वसुली करून नव्याने कर्जवाटप करण्यात येते.
नोंदणीकृत आधार नाही
अमरावती :या व्यवस्थेला कोणताही नोंदणीकृत आधार नसला तरी याकर्जाची परतफेड कोणतेही कारण न सांगता केली जात असल्याने या परंपरेची विश्वासार्हता पाहण्यासारखी आहे.
मेळघाटात गाव पंचायत प्रत्येक गावात असते. या पंचायतीचा प्रमुख साधारणपणे गावातील पोलीस पाटील, आडा पटेल किंवा सर्वमान्य प्रतिष्ठित व्यक्ती असतो. त्याला सहायक म्हणून काही सुशिक्षित मंडळी काम करतात. होळीनंतर गाव पंचायतीद्वारे वाटण्यात आलेल्या कर्जाची सव्वापटीने वसुली केली जाते. याचाच अर्थ वार्षिक २५ टक्के व्याजाची आकाराणी करून कर्ज खुले करण्यात येते. ही रक्कम होळीनंतर व पंचमीच्या पूर्वी गावपंचायतीमध्ये जमा करणे बंधनकारक असते. याचे तंतोतंत पालन प्रत्येक लाभार्थी न चुकता करून आपले कर्तव्य पार पाडतोे. हेच या पंचायतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
सुटसुटीत कर्जवाटपाला प्रामाणिकतेची जोड
वाटण्यात आलेल्या कर्जाची एका रजिस्टरवर नोंद केली जाते. यात कर्जधारकाचे पूर्ण नाव, उचल केलेली रक्कम आणि त्याची सही असते. गरजुंना त्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा केला जातो. यात शेती, लग्न, पूजा आदींसाठी कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाते.
हे कर्ज बुडविण्याचा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. यामुळेच आज प्रत्येक गावातील पंचायतीची रक्कम लाखोंच्या घरात असून जेवढे मोठे गाव तेवढी जास्त उलाढाल. अशी व्यवस्था इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही. कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे केली जाते.