कर्तव्य बजावण्यात मेळघाट पुढे अन् अमरावती माघारला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 01:33 PM2024-11-21T13:33:30+5:302024-11-21T13:34:28+5:30
Amravati : आठ मतदारसंघात १६० उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जिल्ह्यात आठ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात सकाळी ७ पासून तर सायंकाळी ६ दरम्यान झालेल्या मतदान आकडेवारीनुसार कर्तव्य बजावण्यात मेळघाट ७१.७५ टक्केवारीने पुढे राहिला, तर अमरावती मतदारसंघात ५५.९८ टक्केच मतदान झाल्याने माघारला आहे.
जिल्ह्यात २५ लाख ४६ हजार ४५८ मतदारांची नोंदणी झाली होती. गेल्या १५ दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला असताना बुधवारी अमरावती जिल्ह्यातील १६० उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. आता आपला आमदार कोण, हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
बुधवारी कष्टकरी, श्रमजीवी आणि कामगार वस्त्यांमधील मतदान हे सकाळी १० पूर्वीच झाल्याचे दिसून आले. सायंकाळी ५ नंतरचे मतदान हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बाहेरगावाहून परतलेल्या नागरिकांचे होते. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, तिवसा येथे उशिरापर्यंत मतदान झाले. आठ मतदारसंघात एकूण २,७०८ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
मेळघाटातील आदिवासी मतदार झाला सुजान
अनुसूचित जमातीसाठी राखीव मेळघाट मतदारसंघात सर्वाधिक ७१.७५ टक्के मतदान झाले. त्यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधव मतदानाबाबत सुजाण झाल्याचे दिसून येते. अचलपूर मतदारसंघात ७१.१४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत दुसऱ्या क्रमांकावर अचलपूर राहिले.
मतदारसंघ टक्केवारी
अचलपूर ७१.१४ टक्के
धामणगाव ६७.२१ टक्के
मेळघाट ७१.७५ टक्के
बडनेरा ५७.५७ टक्के
दर्यापूर ६५.८४ टक्के
मोर्शी ७१.३० टक्के
अमरावती ५५.९८ टक्के
तिवसा ६७.१० टक्के