मेळघाटचे जंगल होणार ‘टायगर’मय
By admin | Published: January 16, 2017 12:17 AM2017-01-16T00:17:34+5:302017-01-16T00:17:34+5:30
मेळघाटात वाघांच्या वाढत्या संख्येने त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या ...
‘एनटीसीए’कडे प्रस्ताव : वनविभागाचे ७०० किलोमीटर क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात
अमरावती : मेळघाटात वाघांच्या वाढत्या संख्येने त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेरील असलेले बफरक्षेत्र (कोअर) जंगल ताब्यात घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडे पाठविण्यात आला आहे. प्रादेशिक वनविभागाच्या सुमारे ७०० कि.मी. जंगलाचा यात समावेश राहणार आहे. त्यामुळे आता मेळघाटचे जंगल हे ‘टायगर’मय करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांचे संवर्धन करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. देशात ४९ व्याघ्र प्रकल्पांत २,२२६ वाघांची नोंद करण्यात आली आहे. विशेषत: मध्यप्रदेश, महाराष्ट्रात वाघ मोठ्या संख्येने आहेत. विदर्भात ताडोबा, पेंच, मेळघाट, नागझिरा, टिपेश्वर, बोर या अभयारण्यात वाघांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, वाघांचे संवर्धन, संरक्षणात अनंत अडचणी येत असून त्यांना मुक्त संचार करताना जंगलाचे क्षेत्र अपुरे पडत आहे. ही समस्या एकट्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पापुरतीच मर्यादित नसून इतर अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पांमध्ये कायम आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या संचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी प्रादेशिक वनविभागाचे जंगल पुन्हा ताब्यात घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडे पाठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत मेळघाटात ४५ वाघ असून यात ८ ते १० छावे असल्याचा अंदाज व्याघ्र प्रकल्पांच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे.
मेळघाट हे वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय चांगले ठिकाण आहे. यापूर्वी व्याघ्र प्रकल्पातील ७०० कि.मी.क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, आता व्याघ्र संवर्धनासाठी जंगलाचे क्षेत्र अपुरे ठरत आहे. परिणामी प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यातील जंगलक्षेत्र पुन्हा मिळविण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडून मान्यता मिळताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेत नक्कीच वाढ होऊन वाघांचे संरक्षण, संवर्धन करणे सोयीचे ठरेल, हे विशेष. (प्रतिनिधी)
पूर्व, पश्चिम मेळघाटसह अकोला वनविभागाचा समावेश
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील जंगलावर व्याघ्र प्रकल्पांचा ताबा रहावा, यासाठी सुमारे ७०० कि.मी.चा जंगल लक्ष्य करण्यात आला. यात प्रादेशिक वनविभागाच्या पूर्व व पश्चिम मेळघाटसह अकोला वनविभागाच्या क्षेत्राचा समावेश आहे. प्रादेशिक वनविभागाकडील जंगल वाघांना मुक्त संचार करण्यासाठी मिळावे, त्यासाठीचा हा प्रस्ताव आहे.
पेंच, ताडोबा व सह्याद्री अभयारण्यातील बफरक्षेत्र यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. आता मेळघाटचे बफरक्षेत्र परत मिळण्यासाठीचा प्रस्ताव आला आहे. यात पूर्व व पश्चिम मेळघाटचा समावेश आहे. ही बाब प्रशासकीय असून मान्यता मिळताच जंगल व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात दिले जाईल.
- गिरीश वशिष्ठ, वरिष्ठ वनाधिकारी, पीसीसीएफ कार्यालय, नागपूर