मेळघाटातील रुग्णांना ‘रेफर टू अमरावती’चे ग्रहण संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:26+5:302021-06-21T04:10:26+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : मेळघाटातील जनतेला स्वातंत्र्याचा ७४ वर्षांनंतर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६० वर्षांनंतरसुद्धा प्राथमिक सुविधेपासून ...
श्यामकांत पाण्डेय
धारणी : मेळघाटातील जनतेला स्वातंत्र्याचा ७४ वर्षांनंतर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६० वर्षांनंतरसुद्धा प्राथमिक सुविधेपासून वंचित राहावे लागते आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गोरगरीब आदिवासी जनतेला लहानसहान अपघात, जखमा, आजारावरील उपचारासाठीही १५० किमी अंतरावरील अमरावती मुख्यालयात पाठविले जाते. त्यामुळेच तालुक्यातील जनता शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडे जाण्याऐवजी आजाराच्या निवारणासाठी परिहारकडे धाव घेत असल्याचे चित्र आजही कायम आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये कागदोपत्री सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी मोठ्या इमारतीव्यतिरिक्त अंतर्गत व्यवस्था मात्र ईश्वराच्या मर्जीवरच असल्यामुळे लोकांचा आरोग्य विभागावर विश्वास आजही बसलेला नाही. सध्या मेळघाटात धारणीत उपजिल्हा रुग्णालय असून, तेथे ५० खाटांची व्यवस्था आहे. प्रत्येकी १५ किमी अंतरावर एक याप्रमाणे सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक दहा किमी अंतरावर १२ उपकेंद्रे आहेत.