मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मेळघाट सज्ज
By admin | Published: November 29, 2014 12:19 AM2014-11-29T00:19:48+5:302014-11-29T00:19:48+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मेळघाट दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी महसूल, आरोग्य व वनविभाग सज्ज झाला आहे.
श्यामकांत पाण्डेय धारणी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मेळघाट दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी महसूल, आरोग्य व वनविभाग सज्ज झाला आहे. मेळघाटातील पहिल्या दौऱ्यात त्यांना आॅलवेल दाखविण्यासाठी सर्व विभागाने कंबर कसली आहे. आतापर्यंत एमआरईजीएसचे कोणतेही काम सुरू नव्हते. परंतु त्यांना कामे सुरू असल्याचे दाखविण्यासाठी वनविभाग, ग्रामपंचायत आणि जि.प. बांधकाम विभागाकडून तडकाफडकी कामे सुरू करण्यात आली आहे.
सर्वप्रथम मुख्यमंत्री ज्या आश्रम शाळेच्या प्रांगणात हॅलिपॅडवर उतरणार आहे तेथील विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा रातोरात बदलविण्यात आले.
आंथरुन, पांघरुनसह चवदार जेवण दिल्या जात असल्याने तक्रारीची शक्यता लपविण्याचा प्रयत्न आश्रम शाळा प्रशासन करीत आहे. हॅलिपॅडचे काम पूर्णत्वास आले आहे.
वन मालूर या गावात मुख्यमंत्री धावती भेट देणार आहे. त्यासाठी शॉर्टकट असलेल्या मार्गावर मुरुम टाकून पाणी टाकून रोलिंग करण्यात आले आहे. ऐरवी हा रस्ता पायी चालण्यायोग्यही नव्हता. पण आता या रस्त्यांचे भाग्य पालटले आहे. शाळा चकचकीत करण्यात आल्या आहेत. गावात जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या वन संरक्षण समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना आॅलवेलची बाराखडी शिकविण्यात आली आहे. गावात सर्व काही व्यवस्थित दाखविण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री खूश होती हे मात्र निश्चित.