मेळघाटात शिक्षकांना निभावावी लागते पालकाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:11 AM2021-01-04T04:11:45+5:302021-01-04T04:11:45+5:30
कॅप्शन - योगिता जिरापुरे फोटो - ०३एएमपीएच२५ कॅप्शन - मुलांच्या क्षेत्रभेटीदरम्यान एक क्षण. फोटो - ०३एएमपीएच२४ कॅप्शन - मोगर्दा ...
कॅप्शन - योगिता जिरापुरे
फोटो - ०३एएमपीएच२५
कॅप्शन - मुलांच्या क्षेत्रभेटीदरम्यान एक क्षण.
फोटो - ०३एएमपीएच२४
कॅप्शन - मोगर्दा येथील विद्यार्थ्यांचा वाचन उपक्रम.
योगिता जिरापुरे, दोन वर्षे दुर्गम भागात अध्यापन, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपक्रम राज्यस्तरावर
अमरावती : मेळघाटात शिकणारी आदिवासींची मुले साधनिवहीन असतात. त्यांच्या पालकांना जेथे जगण्याची भ्रांत, तेथे मुलांच्या शिक्षणाकडे कुठे लक्ष देणार? त्यामुळे या दुर्गम भागात नियुक्त होणाऱ्या शिक्षकांनाच त्यांच्या पालकांचीही भूमिका बजावावी लागते. एकदा तुम्ही मुलांचा विश्वास जिंकला, आत्मविश्वास निर्माण केला, की ते कुठलेही कठीण शिक्षण घेतील, त्यात रमतील. हा अनुभव कथन केला मोगर्दा (ता. धारणी, जि. अमरावती) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षक योगिता वसंतराव जिरापुरे यांनी. त्या येथे दोन वर्षांपासून आदिवासी मुलांना अध्यापन करीत आहेत.
मेळघाटात नियुक्ती म्हटली की, टाळाटाळ, न्यायालयात धाव असे प्रकार नेहमी घडतात. तथापि, योगिता जिरापुरे यांच्या मेळघाटातील मोगर्दा येथील नियुक्तीला दोन वर्षे झाली आहेत. यापूर्वी वाघोली (ता. मोर्शी) येथे त्यांनी १२ वर्षे अध्यापन केले.
‘आम्ही वृत्तपत्र वाचायला शिकलो’ हा उपक्रम योगिता जिरापुरे यांनी मोगर्दा येथील सहावीच्या मुलांसाठी राबविला. दुर्गम भागात वृत्तपत्र जात नाहीत. त्यामुळे त्यांना त्याची गोडी लावणे कठीण. बहुतांश पालकांनी कधीही वृत्तपत्र वाचलेले नाही. अशा स्थितीतील मुले आता गटकार्यात बातमी तयार करणे, कविता वाचन यामध्ये रममाण झाली आहेत. हा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (पुणे) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
यापूर्वी ‘आम्ही इंग्रजी बोलतो’ हा उपक्रमदेखील त्यांनी शाळेत राबविला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना दोन वाक्ये बोलायची असतात. या उपक्रमाचे चित्रीकरण करून ते औरंगाबाद येथे झालेल्या आरएए (रिजनल ॲकेडमिक अथॉरिटी) च्या कार्यशाळेत प्रदर्शित करण्यात आले. राज्यभरातून सादर झालेल्या चित्रफितींमधून जिरापुरे यांच्या उपक्रमाची चित्रफीत उत्कृष्ट सादरीकरणासाठी वाखाणली गेली. याशिवाय मुलेच मुलांना इंग्रजीत प्रश्न विचारतील, उत्तरे देतील आणि तो प्रश्न पुढे पास करतील असा चेन ड्रील ॲक्टिव्हिटी राबविली जात आहे. परिणामी आता मुले इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू लागली आहेत. अशा उपक्रमांमुळे योगिता जिरापुरे या लोकप्रिय शिक्षिका ठरल्या आहेत. टीएजी (टीचर्स ॲक्टिव्हिटी ग्रुप) कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
योगिता जिरापुरे माता पालकांना सहभागी करून घेण्यासाठी या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून हळदीकुंकू तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील दादी-नानी मेळावा राबवित आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच व्यवहार कौशल्य जागे करण्याचे आनंद मेळावा, साहित्य प्रदर्शन, हस्तलिखित, लेख यावर त्या भर देतात. त्यांच्या प्रेरणेने मोगर्दा शाळेतील एका विद्यार्थिनीने डिजिटल पोस्टर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला.
मेळघाटात गरिबी सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पालक मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे शिक्षणापेक्षा या मुलांना समजून घेण्याची, वेळ देण्याची शिक्षकांना गरज आहे. त्यांचा विश्वास जिंकला, आत्मविश्वास निर्माण केला, तर विद्यार्थी कुठलाही कठीण विषय शिकतील. आमच्या मुलांनी तयार केलेले भोपळ्याचे सुंदर फ्लॉवरपॉट हे त्याचे द्योतक आहे. शेवटी मेळघाटातील आदिवासी हेही माणसेच आहेत. त्यांना संधीची गरज आहे. एक मात्र खरे, मेळघाटात नाइलाजाने जाणारे हाडाचे शिक्षक तेथील मुलांना शिक्षणाची गोडी लावतात, असा अनुभव योगिता जिरापुरे यांनी कथन केला.