मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढगफुटी, सेमाडोहत २४ तासांत ३१० मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:25+5:302021-07-23T04:10:25+5:30

लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच घनदाट जंगलात ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सिपना नदीला ...

Melghat Tiger Project's cloudburst, Semadohat recorded 310 mm of rainfall in 24 hours | मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढगफुटी, सेमाडोहत २४ तासांत ३१० मिमी पावसाची नोंद

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढगफुटी, सेमाडोहत २४ तासांत ३१० मिमी पावसाची नोंद

Next

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच घनदाट जंगलात ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सिपना नदीला गुरुवारी पहाटेपासून पूर आला. सेमाडोहनजीक भूतखोरा नाल्यावरील पूल खचल्यामुळे जड वाहतुकीला धोकादायक ठरला आहे. परिणामी परतवाडा धारणी खंडवा-इंदूर मार्ग बंद करण्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागापुढे दुसरा पर्याय नसल्याने मार्ग बंद होणार आहे.

बुधवारी मध्यरात्रीपासून मेळघाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. धो-धो कोसळणाऱ्या पावसात मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आदिवासी पाड्यांना जोडणारे रस्ते नदी-नाल्यांना पूर असल्यामुळे दिवसभर बंद होते, तर तालुका मुख्यालय व आंतरराज्यीय महामार्गावर ठिकठिकाणी दरड आणि झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आठ तास बंद होती. गुरुवारी सायंकाळी ४ नंतर अल्प प्रमाणात वाहतूक सुरू झाली. सेमाडोह, घटांग, हरिसाल, परतवाडानजीक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परतवाडा-सेमाडोह-धारणी-खंडवा मार्ग बंद झाल्यास अकोट व बैतुल मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे चालकांना लांब अंतराने वाहने न्यावी लागतील.

बॉक्स

भूतखोरा पूल अखेर खचला

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत सेमाडोहचा समावेश आहे. परतवाडा-धारणी-इंदूर मार्गावर हे गाव वसले आहे. तेथील मुलताई ढाण्याजवळचा भूतखोरा नाल्यावरील पूल गुरुवारी पहाटे सिपना नदीला आलेल्या पुरामुळे खचला. या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी मंजूर आहे. गत चार वर्षांपासून व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमांमुळे पुलाचे बांधकाम रखडले आहे.

बॉक्स

आंतरराज्य वाहतूक बंद होणार

भूतखोरा नाल्यावरील पूल एका भागातून खचल्यामुळे जड वाहतुकीसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हा मार्ग बंद करण्यासंदर्भात अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी अधीक्षक अभियंत्यांना तसे कळविले असून यावर अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. मार्ग सुरळीत करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.

बॉक्स

सेमाडोहत ३१० मिलिमीटर पावसाची नोंद

सेमाडोह येथे बुधवारी सकाळी ८ पासून गुरुवारी सकाळी ८ पर्यंत ३१० मिलिमीटर पावसाची नोंद निसर्ग निर्वचन संकुलाच्या जलमापन केंद्रावर झाली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी दिली. इतरही व्याघ्र प्रकल्पांतील जलमापन केंद्रांवरील पावसाच्या नोंदी घेतल्या जात असल्याचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी सांगितले.

कोट

सेमाडोह येथील भूतखोरानजीक पूल खचल्यामुळे इंदूर मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांना कळविले आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल

- चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर

Web Title: Melghat Tiger Project's cloudburst, Semadohat recorded 310 mm of rainfall in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.