मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 01:56 PM2022-01-13T13:56:05+5:302022-01-13T14:02:27+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत विविध पर्यटन उपक्रम पुढील आदेशापर्यंत बंद करण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. ज्ञानगंगा काटेपूर्णा, नरनाळा, सेमाडोह, चिखलदरा, आमझरी, वन उद्यान आदी ठिकाणे पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आली आहेत. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटन संकुल व विश्रागृह यांना टाळे लावण्यात आले आहे.
कोविड-१९ व ओमायक्रॉन या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. अमरावती, अकोला, बुलडाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा आदेश जारी केले. त्यावरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
विश्रामगृहांना टाळे
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अतर्गत ज्ञानगंगा, काटेपूर्णा, नरनाळाचा भाग, अकोला, बुलडाणा, पांढरकवडा व मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाचा अतिसंरक्षित परिसर येत असल्याने त्या अंतर्गत पर्यटक संकुल, आमझरी, सेमाडोह, कोलकास, चौराकुंड, रायपूर, खानापूर, ढाकणा आदी इतर विश्रामगृहांचा समावेश आहे. पर्यटकांसाठी ते १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
हत्ती गेले सुट्टीवर
जंगल सफारी बंद करण्यासोबत कोलकास येथील हत्ती सफारीसुद्धा बंद करण्यात आली. १५ जानेवारीपर्यंत आयुर्वेदिक औषधोपचारासाठी सुटीवर असलेले चारही हत्ती आता नवीन नियमाने सुटीवर गेले आहेत.
चिखलदरा पर्यटनस्थळ बंद
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळ पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाच किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक कारणाशिवाय रात्री बाहेर पडू नये. कोणत्याही प्रकारचे समारंभ हे जास्तीत जास्त पन्नास लोकांच्या उपस्थितीत करता येतील. नागरिक, पर्यटकांनी सहकार्य न केल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिला आहे.