मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५२ वाघ, २२ बछडे अन् १४७ बिबट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:00 AM2023-03-08T11:00:06+5:302023-03-08T11:01:08+5:30
राज्यातील पहिल्या प्रकल्पात वाघांच्या प्रजनन वाढीसाठी अन्य वन्यजीवांचे संवर्धन
अमरावती : दऱ्या, खोऱ्यात विसावलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची ५० व्या वर्षांकडे वाटचाल सुरू झाली आहे. या व्याघ्र प्रकल्पात ५२ वाघ, २२ छावे आणि १४७ बिबट असल्याची नोंद गतवर्षी झालेल्या वन्यजीव गणनेनंतर करण्यात आली आहे. रानगवा, हरीण, काळवीट, रानडुकरांचे अधिवास वाघांच्या प्रजननासाठी पोषक ठरणारे आहे.
विदर्भात मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य तर सह्याद्री हा पश्चिम महाराष्ट्रात आहे. देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वात मोठा आणि राज्यातील पहिल्या या व्याघ्र प्रकल्पाने यशस्वी वाटचालीची ४९ वर्षे पूर्ण केली असून पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. २२ फेब्रुवारी १९७४ ला अस्तित्वात आलेला हा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननास व वास्तव्यास अनुकूल ठरला आहे. मेळघाटवर व्याघ्र प्रकल्पाचे एक छत्री नियंत्रण असून मेळघाट वाघांसह अन्य वन्यजीवांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे. व्याघ्र संवर्धनात स्थिरावलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. यात ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे. एका वाघाला साधारणतः २५चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. या अनुषंगाने मेळघाटात शंभराहून अधिक वाघ वास्तव्य करू शकतात, अशी रचना आहे.
मेळघाटात रानगवा संख्यावाढीवर संशोधन
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि बिबट्याच्या प्रजनन वाढीसाठी त्यांना आवश्यक खाद्य मिळत आहे. यात रानगवा आघाडीवर आहे. काळवीट, हरीण, सांबर, रानडुकरांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रानगव्याची सर्वाधिक प्रजनन संख्या आहे. मेळघाटात रानगवा वाढीच्या कारणमीमांसेविषयी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्राचार्य बेग हे संशोधन करीत आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५२ वाघ, २२ छावे आणि १४७ च्यावर बिबट आहे. इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पोषक वातावरण आहे. जंगल सफारीने पर्यटनात भर घातली आहे. निसर्ग सौंदर्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प नटला असून वनौषधी, विविध जातीचे वृक्ष, सरपटणारे प्राणी, दुर्मीळ घुबडाची नोंद येथे करण्यात आली आहे.
- मनाेजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, मेळघाट क्राईम सेल