मेळघाट : ‘व्हिजन २०२४’ तयार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:47 AM2019-10-19T11:47:11+5:302019-10-19T11:49:13+5:30

मेळघाटातील माझ्या जनतेने संधी दिल्यास प्रशासनातील संपूर्ण अनुभव पणाला लावून मेळघाट सुजलाम् सुफलाम् करेन, अशी ग्वाही रमेश मावस्कर यांनी दिली.

Melghat: 'Vision 2024' is ready! | मेळघाट : ‘व्हिजन २०२४’ तयार !

मेळघाट : ‘व्हिजन २०२४’ तयार !

googlenewsNext
ठळक मुद्देरमेश मावस्कर यांची ग्वाहीप्रशासनातील अनुभव पणाला लावणार

 लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मेळघाटात तेंदूपत्ता उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यातून आदिवासींच्या हाताला काम आणि दाम मिळावे, त्याचे योग्य नियोजन व्हावे, आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा, यावर आपला भर राहणार आहे. प्रशासनात तालुका, जिल्हा व विभागस्तरावर सेवा दिली. गाठिशी अनेक उत्तम अनुभव जमा झालेत. कार्यकुशल अधिकारी माझ्या कारकिर्दीत लाभले. प्रभावी लोकप्रतिनिधींचे कार्य मी जवळून अनुभवू शकलो. लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कौशल्ये मला आत्मसात करता आलीत. योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठीच्या अडचणी आणि उपाय दोन्हींची जाणीव मला आली आहे. हे असे पहाडाएवढे अनुभव गाठीशी आहेत. मेळघाटातील माझ्या जनतेने संधी दिल्यास प्रशासनातील संपूर्ण अनुभव पणाला लावून मेळघाट सुजलाम् सुफलाम् करेन, अशी ग्वाही रमेश मावस्कर यांनी दिली.
मेळघाटातून आदिवासी, गवळी व इतर समाजबांधव रोजगाराअभावी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. येथील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय शेती व दुग्धोत्पादन हा आहे. त्यातून त्यांना रोजगार मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गुजरात राज्यातील अमूल डेअरीच्या धर्तीवर दूध संकलन व प्रक्रिया केंद्र उभारल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे अभिवचन रमेश मावस्कर यांनी मेळघाटवासीयांना या मुलाखतीच्या माध्यमातून दिले.
माझ्या प्रशासकीय अनुभवाचा त्यासाठी मोठा लाभ होणार आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार आहे. खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मेळघाटात येऊन दुग्धसंकलन व प्रक्रिया केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली. मेळघाटवासीयांनी मला विधिमंडळात पाठविल्यास त्यांच्या प्रेमाचे पांग मी दुग्धप्रक्रिया केंद्र उभारूनच फेडणार, अशा भावना रमेश मावस्कर यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांची लाभलेली भक्कम साथ या कार्याला गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरवठा उपायुक्त राहिलेले मावस्कर हे मेळघाटातील उमेदवारांपैकी सर्वाधिक शिक्षित उमेदवार आहेत. ते महायुतीकडून रिंगणात आहेत.

प्रश्न : मेळघाटसाठी काय संकल्प आहेत?
उत्तर : राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. वडील पटल्या गुरूजी हे माजी आमदार. त्यांचे समाजकारण, आदिवासींच्या समस्या दूर करण्याची तळमळ पाहत आलो आहे. त्यामुळे प्रथम प्रशासकीय सेवेतून त्याबाबत काही करता येईल, या अपेक्षेने शासकीय नोकरीची वाट धरली. मात्र, अपेक्षित परिणाम दृष्टीस पडत नसल्याने थेट राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. मतदारसंघातील धारणी, अचलपूर व चिखलदरा या प्रत्येक तालुक्यांतील गावांचा विकास आराखडा तयार आहे.
प्रश्न : धारणी परिसरासाठी काही योजना ?
उत्तर : मेळघाटात कुपोषणाचा गंभीर प्रश्न आहे. आरोग्याच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याची समस्या, खेडेगावांतील रस्ते यांची स्थिती चिंताजनक आहे. पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. धारणी येथे प्रशासकीय भवनाच्या निर्मितीवर आपला भर राहणार आहे. आदिवासींना शासकीय कामासाठी कार्यालयाचे उंबरठे किती झिजवावे लागतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात त्यांची ससेहोलपट होऊ नये, यासाठी प्रशासकीय भवन कार्यान्वित करेन.
प्रश्न : शेती व रोजगाराबाबत आपले धोरण कसे राहिल?
उत्तर : मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यावर सर्वप्रथम आपला भर राहणार आहे. रोजगारासाठी शेतीसह जोडधंदा करण्यासाठी विविध व्यवसायांची निर्मिती, शासनातर्फे त्यांना सुविधा पुरविण्याची व्यवस्था केली जाईल. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन, २४ तास विजेसाठी सोलर प्लांट निर्मिती करू.
प्रश्न : ग्रामविकास अन् शिक्षणाबाबत काय योजना आहेत?
उत्तर : ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा अभाव मेळघाटच्या सर्वच गावांमध्ये आहे. तेथे ग्रामपंचायत भवनांची निर्मिती केली जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक महाविद्यालयाची निर्मिती करण्याचे स्वप्न आहे. त्यातून मेळघाटातीलच आदिवासी विद्यार्थी डॉक्टर होतील. आदिवासी महिलांच्या बचत गटातून सक्षमीकरण करण्यावर भर राहणार आहे.
प्रश्न : आरोग्यासंदर्भात आपला प्राधान्यक्रम कसा राहिल?
उत्तर : धारणी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आहे. तथापि, आदिवासींना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची निर्मिती व्हायला हवी. चुरणी तालुका प्रस्तावित असून, त्याकरिता पाठपुरावा करणार आहे. सर्व शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी, यासाठी एक खिडकी योजनादेखील डोक्यात घोळत आहे. यामुळे आदिवासींची दगदग व दलालांचा सुळसुळाट कमी होईल.
प्रश्न : व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत काय?
उत्तर : स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरसुद्धा मेळघाटात वीज, पाणी, रस्ता, आरोग्य सुविधा या पायाभूत गरजांची वानवा आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटी नसल्याने आदिवासींमध्ये संवाद होत नाही. मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट सेवेवरसुद्धा भर देणार आहे. त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे मिळतील. जगाची माहिती होईल. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गावांचे पुनर्वसन मेळघाटतच करण्यावर आपला भर राहणार आहे.

मी मेळघाटातील रहिवाशी आहे. आदिवासी कुटुंबात जन्माला आल्याने त्यांच्या संस्कृती आणि समस्येशी एकरूप आहे. मेळघाट प्रांतातील समस्यांची मला जवळून जाण आहे. त्या सोडविण्यासाठीचे उपायदेखील माझ्याकडे तयार आहेत. प्रशासनातील दांडगा अनुभव आहे. मेळघाटला सोन्याचे दिवस आणण्याची मनापासूनची इच्छा आहे. दुग्धप्रक्रिया आणि माझ्या संकल्पनेतील इतर योजना हे त्यासाठीचे प्रभावी उपाय आहेत.

- रमेश मावस्कर

Web Title: Melghat: 'Vision 2024' is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.