‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:22 AM2024-10-01T07:22:28+5:302024-10-01T07:31:36+5:30
किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला सोमवारी, ३० सप्टेंबरला ३१ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त ‘ब्लॅक-डे’ पाळला जात असताना भूकंपाचे हादरे जाणवल्याने किल्लारीच्या आठवणींनी धस्स झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर या तालुक्यांसह काही गावांमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे सौम्य झटके बसले. दोन सेकंदांच्या या भूकंपाच्या झटक्याने नागरिक हादरून गेले. अचानक जमीन हलल्यामुळे दहशत पसरली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.
कुठे काय घडले?
nपरतवाडा येथील ब्राह्मण सभेत पलंग, डायनिंग टेबल, टीनपत्रे हलले
nजमिनीतून सौम्य असा आवाजही आला. लोक त्वरित घराबाहेर पडले.
nधारणी, चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुर्णी, खटकाली, सेमाडोह, हरिसाल या पट्ट्यातील अनेक घरांना हादरे बसले.
nचिखलदऱ्यात घराच्या भिंतीला तडे गेल्याचे प्रभारी तहसीलदारांनी सांगितले.
किल्लारीच्या आठवणी
किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला सोमवारी, ३० सप्टेंबरला ३१ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त ‘ब्लॅक-डे’ पाळला जात असताना भूकंपाचे हादरे जाणवल्याने किल्लारीच्या आठवणींनी धस्स झाले.
चार गावांना धक्के
अकोला : जिल्ह्यातील चार गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये अकोट तालुक्यातील रुधाडी, खिरकुंड, पिंप्री जैनपूर ही तीन गावे व तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड या गावांचा समावेश आहे. यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.