मेळघाट जलमय; २७ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:58 AM2019-07-30T11:58:16+5:302019-07-30T11:59:33+5:30

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे.

Melghat watery; 27 villages lost contact | मेळघाट जलमय; २७ गावांचा संपर्क तुटला

मेळघाट जलमय; २७ गावांचा संपर्क तुटला

Next
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात संततधार पूल खचले, युवक बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. यात दिया व उतावली दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने धारणी तालुक्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. २४ तासांत मेळघाटात तब्बल २३७ मिमी पाऊस झाल्याने मेळघाट जलमय झाला आहे. मेळघाटातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पहिल्याच मोठ्या पावसाने मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान प्रभावित झाले आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील दोन तालुक्यांच्या १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना, गडगा, तापी व छोट्या मोठ्या नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास सिपना नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे हरिसाल येथील दहा व दुनी येथील काही घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाद्वारे तेथील बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची जि.प. शाळेमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परतवाडा ते अंजनगाव सुर्जी रस्त्यावर सापन नदीवरील वडगाव फत्तेपूर येथील पूल खचलेला असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील चुरणी-काटकुंभ मार्गावर दरड कोसळल्याने तो मार्ग काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानूर प्र्रकल्पामध्ये मासे पकडण्यास गेलेला तरुण वाहत गेला. घरालगतच्या जि.प. शाळेची भिंत अंगावर कोसळून एक चिमुकली गंभीर जखमी झाली. धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व मोर्शी तालुक्याला संततधार पावसाचा फटका बसला. ७२ तासांपासून कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अप्पर वर्धा, सपन, पूर्णा, शहानूर व चंद्रभागा या पाचही सिंचन प्रकल्पांच्या जलसंचयात मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार शोध बचाव पथकाचे दोन पथक मेळघाटात पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Melghat watery; 27 villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस