आरोग्य संवर्धनासाठी मेळघाटात झोन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:50+5:302021-06-10T04:09:50+5:30
अमरावती : कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे झोन कार्यक्रम १० ते १७ जूनपर्यंत ...
अमरावती : कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे झोन कार्यक्रम १० ते १७ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दक्षतापूर्वक हा कार्यक्रम पार पाडण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. झोन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
झोन कार्यक्रमासाठी ७६ पथके गठित करण्यात आली आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. झोन कार्यक्रमात अंगणवाडीमध्ये जाऊन वजन घेणे, नंतर त्या बालकाचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम बालकांचे संनियंत्रण व उपचार केले जाते. ज्या बालकांना केंद्रात भरती करण्याची गरज आहे. अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानंतर भरती करण्यात येऊन त्यांना आवश्यक उपचार मिळवून दिले जातात. गरज पडल्यास उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथून जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवा दिली जाते, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.
बॉक्स
या कार्यक्रमांची अंमलबजावणी
गरोदर माता तपासणी, स्तनदा माता तपासणी प्रतिबंध, उपचार व संदर्भ सेवा देऊन माता मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. कुपोषित बालकांची तपासणी, दुर्धर आजारी बालकांची तपासणी, कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया, गलगंड, सिकलसेल आदी आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी यात केली जाते. पाणी नमुने घेऊन ते तपासणीला पाठविले जातात.
बॉक्स
आरोग्य विषयक मार्गदर्शन, समुपदेशन
गावातील वृद्ध व्यक्ती असल्यास किंवा ज्यांना मोतिबिंदू आढळला, त्यांची तपासणी व संदर्भ सेवा दिली जाते. विविध योजनांचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आरोग्यविषयक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. चिखलदऱ्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश प्रधान व धारणीच्या तालुका आरोग्य अधिकारी जयश्री नवलाखे यांनी नियोजन केले आहे.