मेळघाटच्या ‘ग्रास मॅन’ ने १२ राज्यातील ३० व्याघ्र प्रकल्पात फुलविले कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:44 PM2021-07-29T13:44:18+5:302021-07-29T13:44:42+5:30
Amravati News चिखलदरा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने एक दोन नव्हे, तब्बल देशातील १२ राज्यातील ३० पेक्षा अधिक व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरणक्षेत्र तयार केले आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जंगल असेल तर वाघ दिसेल, वाघासाठी आवश्यक असलेले तृणभक्षी प्राणी आणि त्या प्राण्यांसाठी अति आवश्यक असलेले गवती कुरण अशा या अन्नसाखळीला तयार करण्यासाठी चिखलदरा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने एक दोन नव्हे, तब्बल देशातील १२ राज्यातील ३० पेक्षा अधिक व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरणक्षेत्र तयार केले आहे. त्यामुळे पर्यावरणासह व्याघ्र संवर्धनात मोठी मदत झाली आहे.
चिखलदरा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गजानन मुरतकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. गवती कुरणामुळे जमिनीची धूप, तापमान थांबण्यासह पाण्याचा निचरा, कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांना नैसर्गिकरीत्या आश्रयस्थान, तृणभक्षी प्राण्यांना आवडते खाद्य व वाघ, बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांना जंगलातच शिकार मिळत असल्याने शहरात जाऊन मानव-वन्यजीव संघर्ष थांबण्यास मदत झाली आहे. एकंदर मुंगी ते हत्तीपर्यंत गवत अन्नसाखळीचा दुवा ठरले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात इतर व्याघ्र प्रकल्पांपेक्षा ११६ पेक्षा अधिक गवताच्या प्रजाती आहेत. ताडोबात केवळ बांबू असल्याने मेळघाटच्या सांभरपेक्षा तेथील तृणभक्षी प्राणी कमी वजनाचा असल्याचे निष्कर्ष पुढे आल्याचे मुरतकर यांनी सांगितले.
तृणभक्षी प्राण्यांत गवताच्या आवडीनिवडी
मानवांमध्ये जेवणाच्या आवडीनिवडी आहेत त्याचप्रमाणे चितळ, गवा, सांबर, अशा विविध तृणभक्षी प्राण्यांच्या आवडीनिवडी आहेत, काहींना मुलायम व कडक गवत आवडते. त्यानुसार चितळ मार्व्हल गवत हे रसगुल्लाप्रमाणे आवडते, तर गवा कुसळी व गोंधळी, सांबर गवत कमी व झाडांची पाने, फुले, फळे जास्त खातो. तृणभक्षी प्राण्यासाठी दुर्वा, पवन्या, रानतूर, रानमूग, रानसोयाबीन, बांबू, अशा विविध प्रजातींचे गवत आहे.