मनपात ‘जीएडी’वाऱ्यावर
By admin | Published: July 12, 2017 12:10 AM2017-07-12T00:10:15+5:302017-07-12T00:10:15+5:30
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग अर्थात ‘जीएडी’त अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घुसखोरी चालविली आहे.
उपायुक्तांचा लक्षवेध : मोक्याची जागा पटकावण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग अर्थात ‘जीएडी’त अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घुसखोरी चालविली आहे. जीएडी अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांचे या घुसखोरीला पाठबळ मिळाल्याने विभागातील गोपनियतेला सुरूंग लागला आहे. उपायुक्त महेश देशमुख हे या बाबींपासून अनभिज्ञ आहेत. जीएडीत लक्ष घालून अन्य विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या घुसखोरीला त्यांनी आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तूर्तास जीएडीत आकृतीबंध, पदोन्नती, सेवाप्रवेश नियम आणि गोपनीय अहवालाची नोंद घेण्यासारखे महत्त्वपूर्ण कामकाज सुरू आहे. शो-कॉज, वेतनवाढ रद्द करणे, थांबविण्यासह अनेक करारांवर अंतिम शिक्कामोर्तब जीएडीद्वारे केली जाते. निवेदिता घार्गे रजेवर गेल्यानंतर सहायक आयुक्तपदाचा पदभार विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांचेकडे आहे. तथापी चव्हाण यांच्याकडे त्यांच्या मूळ पदासह बाजार परवाना अधीक्षकपदाची जबाबदारी असल्याने ते जीएडीला अधिक वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मिसाळ यांचेकडील जबाबदारी शतपटीने वाढली आहे. त्यामुळे मिसाळ यांनी गोपनीय आणि कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाज मर्जीतील कर्मचाऱ्यांकडे सोपविले आहे. त्यामुळे उच्च अधिकाऱ्यांना अनभिज्ञ ठेवून मर्जीतील कर्मचाऱ्याला घुसखोरी वा प्रवेशाला मिसाळ यांचे बळ असल्याची बाब अधोरेखित होते. या विशिष्ट कर्मचाऱ्याला ‘जीएडी’त येण्याचे वेध लागल्याने मिसाळ यांनी त्याला अर्थपूर्ण बळ दिल्याचा आरोप होत आहे.
काम जीएडीचे, मार्गदर्शन भांडार विभागाचे
जीएडी अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या नाकावर टिच्चून जीएडीतील काही कर्मचारी अत्यंत महत्त्वाच्या फाईल्सवर भांडारचे मार्गदर्शन घेत असल्याची बाब उघड झाली आहे. जीएडीतील महत्त्वपूर्ण फायलींचा प्रवास भांडार विभागाकडे होत असल्याने या संशयास्पद प्रकाराला उपायुक्त महेश देशमुख यांनी आळा घालावा, अशी मागणी आहे. भांडारच्या मार्गदर्शनात एका कर्मचाऱ्याला ‘जीएडी’त इंटरेस्ट असल्याने त्याची घुसखोरीही संशयास्पद ठरली आहे.