पानटपरीवर ‘म्याव म्याव’ ऑन सेल! 'त्या' विशिष्ट भागात बिनबोभाट विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:51 PM2023-07-12T12:51:41+5:302023-07-12T12:52:34+5:30

साखळीबद्ध गोरखधंदा : गस्त वाढविण्याची गरज

'Meow Meow' on sale at Pantapari! Unencumbered sales in amravati | पानटपरीवर ‘म्याव म्याव’ ऑन सेल! 'त्या' विशिष्ट भागात बिनबोभाट विक्री

पानटपरीवर ‘म्याव म्याव’ ऑन सेल! 'त्या' विशिष्ट भागात बिनबोभाट विक्री

googlenewsNext

अमरावती : तरुणाईला कैफ चढविणाऱ्या एमडी अर्थात ‘म्याव म्याव’ची शहरातील विशिष्ट भागातील पानटपरीवर खुलेआम विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. शहर पोलिसांनी मागील वर्षाप्रमाणेच यंदादेखील दोन दमदार कारवाया केल्या. मात्र, तरीदेखील गांजा, अफीमच्या विक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या त्या विशिष्ट भागात एमडी ड्रग्स विकले जात आहे.

‘एनपी’ अर्थात नॅशनल परमिट मिळाले की काय, अशा आविर्भावात एमडीचा गोरखधंदा सुरू आहे. विशेष म्हणजे छत्री तलाव, वडाळी तलाव याठिकाणीसुद्धा सकाळी व सायंकाळी एमडी विक्रेत्यांचा मुक्त वावर असल्याची माहिती हाती आली आहे.

मेफेड्रॉन अर्थात एमडी शर्टाच्या बाह्यात किंवा कुठेही बेमालूमपणे ठेवले जाते. नशेखोरीसाठी अलीकडे एमडीच्या पुडीला सर्वाधिक मागणी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मात्र, पोलिसांच्या भीतीने एमडीची विक्री ठोकमध्ये न करता पानटपरीवरून किरकोळ विक्रीचा राजमार्ग अवलंबविला जात असल्याची माहिती हाती आली आहे.

एमडी ड्रग्स म्हणजे काय?

कॉलेजच्या मुला- मुलींमध्ये 'म्यॅाव म्यॅाव' आणि 'एम-कॅट' अशा सांकेतिक भाषेत 'फेमस' असललेल्या 'एमडी ड्रग' विशिष्ट डिलिव्हर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे. तरुणाईला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक आहे. सन २०२२ मध्येदेखील सीपींच्या विशेष पथक व नागपुरी गेट पोलिसांनी एमडी ड्रग्स जप्त केले होते.

रिसिव्हर तपासण्याची आवश्यकता

एमडी विक्री करणाऱ्यास पोलिस पकडतात खरे. मात्र, पीसीआर संपला की, एमसीआर अन् नंतर सुटका. त्यामुळे केवळ छोटे मासे गळाला लागतात. सबब, तो ‘डिलिव्हरी मॅन’ ते एमडी ड्रग्ज नेमका कुणाला विकणार होता, यापूर्वी त्याने ते ड्रग्स कुणाला विकले, कुठून आणले, या दिशेने सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्याच्या मोबाइलचा सीडीआर काढणे गरजेचे आहे.

यंदा शहर पोलिसांच्या दोन कारवाया

जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात इतवारा बाजारात 'एमडी'ची विक्री करणाऱ्या डिलिव्हरी मॅनला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम मेफेड्रॉन 'एमडी' ड्रग्स जप्त करण्यात आले. मोहम्मद वजीद वल्द अब्दुल नासीर कुरेशी (४०), रा. गवळीपुरा, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर दुसरी कारवाई मार्चच्या पहिल्या आठवड्यात नांदगाव पेठ रोडवरील एका हॉटेलजवळ करण्यात आली. गुन्हे शाखेने ३०० ग्रॅम मेफिड्रोन (एमडी) घेऊन शहरात येणाऱ्या तिघांना अटक केली होती. पोलिसांनी मुंबईतील पुरवठादारालाही बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिस आयुक्त गंभीर

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पदभार स्वीकारताच शहरात होणाऱ्या एमडी विक्रीच्या अनुषंगाने पुरवठादारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेला मार्गदर्शनदेखील केले होते. एमडी शहरात कुठून येते, त्याचा पुरवठादार कोण, स्थानिक वितरक कोण, याची माहिती काढण्यासाठी सायबर विभागाची मदत घेण्यात येऊन ठोस कारवाईदेखील करण्यात आली.

Web Title: 'Meow Meow' on sale at Pantapari! Unencumbered sales in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.