अचलपुरात व्यापाऱ्यांचा माल रस्त्यावर

By admin | Published: February 4, 2015 11:07 PM2015-02-04T23:07:56+5:302015-02-04T23:07:56+5:30

येथील काही व्यापारी आपल्या प्रतिष्ठानचा माल अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवतात. काही जण दुकानाचा फलक रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

Merchandise merchandise at Achalpur | अचलपुरात व्यापाऱ्यांचा माल रस्त्यावर

अचलपुरात व्यापाऱ्यांचा माल रस्त्यावर

Next

वाहतूक विस्कळीत : नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त
अचलपूर : येथील काही व्यापारी आपल्या प्रतिष्ठानचा माल अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवतात. काही जण दुकानाचा फलक रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. पायी चालणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन यावर काहीच कारवाई करायला तयार नाही.
जुळ्या शहरात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना तोंड देताना नागरिक अगदी मेटाकुटीला आले आहेत. अतिक्रमण मग ते छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे असेल किंवा आमचे कोण काय बिघडवते, असे मनात ठामपणे मांडून काही मोठे व्यापारी राजरोसपणे आपापल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानातील माल अगदी रहदारीला अडथळा निर्माण होईल इतपत रस्त्यावर आणून लावण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. एवढेच नव्हे, तर फलक दुकानावर लावलेले असतानाही दुसरे फलक रस्त्याच्या मधोमध आणून रहदारीला अडथळा निर्माण करण्याचे कार्य अगदी न चुकता करीत आहेत. असे चित्र परतवाड्यातील बस स्थानक मार्ग, मेन रोड, सदर बाजार, गुजरी बाजार, दुराणी चौक, मिश्रा चौक यासह आदी ठिकाणी हमखास बघायला मिळते. अचलपूर येथे चावलमंडी, देवडी, पोलीस स्टेशन रोड, उपजिल्हा रुग्णालयाचा रस्ता, गांधी पूल, सराफा लाईन, बुद्धेखा चौक आदी ठिकाणी यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.
यात आणखी भर म्हणजे अस्तव्यस्त उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांची गर्दी आदी प्रकारामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. बाजारहाट करायला निघालेल्या महिलांना याचा विशेष करून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्तपणे वाहने उभे करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची व्यवस्था नगरपरिषदेकडे आहे. पण त्यांचा वापर न करता नगरपरिषद संपूर्णपणे पोलीस प्रशासनावर अवलंबून राहत आली आहे. पोलीस आपल्या कामात किती तत्पर आहे याचे भान नगरपरिषदेला नाही, असेच म्हणावे लागेल.
नगरपरिषदेद्वारा काही दिवसांपूर्वी अनेक भागात डांबरी रस्ते तर कुठे काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले. मात्र यारस्त्यांचे काम कसे होत आहे त्याचा दर्जा काय आहे, डांबराचे प्रमाण बरोबर आहे की नाही, सिमेंटच्या रस्त्यात सिमेंट किती टाकले याची दखल कोणीही घेताना दिसले नव्हते. या कामांवर कधी नगरपरिषदेचा अधिकारी आढळून आला नव्हता. शहरात झालेल्या डांबरी व काँक्रीट रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण? सगळा कमिशनचा धंदा सुरू असल्याचे बोलले जाते.
जनतेचा पैसा असा उधळण्यासाठी कोणी परवानगी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच याबाबत कानउघाडणी करण्याची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकामे सुरू असल्याचा आणि बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रकार तर चिंतेचा विषय बनला आहे. सुस्त प्रशासनास कोणीतरी जागे करण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Merchandise merchandise at Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.