व्यापाऱ्याची आत्महत्या
By admin | Published: July 1, 2014 01:15 AM2014-07-01T01:15:32+5:302014-07-01T01:15:32+5:30
तीन दलालांच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत नरखेड रेल्वे पुलाजवळ सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली.
साहाब कडीसे कडी सजा दो : पोलीस अधीक्षकांच्या नावे चिठ्ठी
बडनेरा : तीन दलालांच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत नरखेड रेल्वे पुलाजवळ सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. राकेश प्रभुदास नदियाना (४५, रा. प्रफुल्ल कॉलनी, साईनगर) असे मृताचे नाव आहे.
राकेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांच्या नावाने मृत्युपूर्व चिठ्ठी सोडली आहे. ‘सन्मानीय पोलीस अधीक्षक साहाब, मैने किसी को धोका नही दिया. मुझे आत्महत्या करने को प्रवृत्त करने वालो को कडी से कडी सजा दो,’ असे मृत्युपूर्व चिठ्ठीत नमूद आहे. राकेश नदियाना धान्याचे व्यापारी होते. राकेश नादियानी हे प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय करीत होते. रविवारी रात्री ८.३० वाजता राकेश हे त्यांच्या एम. एच. २७ ए. यु. ३५०२ या दुचाकीने महेशनगर येथे रामू करवा यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री उशिरा ते घरी परतले नाहीत.
लहान भावाच्या नावाने चिठ्ठी
-राकेश यांनी त्यांच्या लहान भावाच्या नावानेही मृत्युपुर्व चिठ्ठी सोडली आहे. विपुल भाई जय श्रीकृष्ण, मै जा रहां हु. सब घरपर, दोनो लडकीयाँ और तेरी भाभी का ख्यॉल रखना,’ असे राकेश यांनी चिठठीत नमुद केले आहे.
शेतीचा होता वाद
-राकेश यांनी प्रमोद श्रीराम वाट यांच्या मालकीचे दाभा येथील साडेतीन एकर शेत विकत घेण्यासाठी तीन दलालांच्या माध्यमातून इसार चिठ्ठी केली होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी शेत विकत घेण्यास नकार दिली . वरील दलाल राकेश यांना शेत विकत घेण्यासाठी जबरदस्ती करीत होते, असा आरोप राकेश यांचे भाऊ विपुल यांनी केला आहे.
चिठ्ठीत तीन व्यापाऱ्यांची नावे
त्यांचे भाऊ विपुल यांनी राकेश यांचा शोध घेणे सुरु केले. त्यांनी करवा यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. परंतु ते बाहेगावी असल्याची माहिती त्यांना मिळाली. राकेश यांच्या ‘मिसींग’ची तक्रार देण्यासाठी विपुल े राजापेठ पोलीस ठाण्यात गेले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांची तक्रार न घेता राकेश यांचा नातेवाईकांच्या घरी शोध घेण्याचा सल्ला त्यांच्या भावाला दिला.
दरम्यान राकेश यांनी अमरावती मार्गावरील नरखेड रेल्वे पुलाजवळ विष प्राशन करुन आत्महत्या केली, अशी माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त जी. एम. साखरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. भंडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ही माहिती राकेश यांच्या भावाला दिली. पंचनाम्यानदरम्यान पोलिसांना राकेश यांनी लिहून ठेवलेली मृत्युपूर्व चिठ्ठी मिळाली. ‘पोलीस अधीक्षक साहाब मै राकेश प्रभुदास नदियाना यह निर्णयपर पहुचा हुँ की, रतिलाल पटेल, अनिल हिंगे व सुने मुझे चार महिने से टॉर्चर करके मझे धमकीयाँ दे रहे थे. मैने किसी को धोका नही दिया इस लिये मै आत्महत्या कर रहा हुॅ भगवान एैसी परिस्थिती किसी पे न लाये. इन तीनो को कडी से कडी सजा दे,’ असे राकेश यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त करुन राकेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. राकेश त्यांच्या मागे पत्नी संगीता, दोन मुली नयनसी, डिंप्पल व भाऊ विपुल असा परिवार आहे.