मेळघाटात पर्यटकांना वऱ्हाडी भाषेतून स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:56+5:302020-12-25T04:11:56+5:30
पान १ फोटो - २४एएमपीएच०२नरेंद्र जावरे - चिखलदरा : ‘लक्ष द्या दे बे पोट्टे हो...’, ‘मेळघाटमंदी दारूच्या बाटल्या ...
पान १
फोटो - २४एएमपीएच०२नरेंद्र जावरे - चिखलदरा : ‘लक्ष द्या दे बे पोट्टे हो...’, ‘मेळघाटमंदी दारूच्या बाटल्या फेकू नका बे’ अशा एक ना अनेक मथळ्याचे स्वच्छता फलक मेळघाट व्याघ्र प्रकल्पात झळकले आहेत. समाज माध्यमांवर चर्चेत आलेल्या एका शिक्षकाच्या वऱ्हाडी बोलीचा धागा पकडून मेळघाटातील आदिवासी गाईड युवकांनी शहरी पर्यटकांना लक्षवेधी संदेश या फलकांद्वारे दिले आहेत.
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा व मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येतात. जंगलात रस्त्यांवर प्लास्टिक कॅरीबॅग, विविध खाद्यपदार्थ, वेफर्स, चिवड्याची पाकिटे, शीतपेयासह पाण्याच्या प्लास्टिक बॉटल वाटेल तेथे फेकण्यात येत असल्याचे चित्र नवीन नाही. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलकसुद्धा लावण्यात आले आहेत. चिखलदरा व इतर ठिकाणी पर्यटकांना कचरा गोळा करण्यासाठी वाहनात एक पिशवी दिली जाते. तरीसुद्धा हा प्रकार नित्याचा झाला आहे. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी नवीन कल्पनेतून सेमाडोह येथील गाईड युनियनतर्फे वऱ्हाडी भाषेतून फलक झळकवले आहेत. ते चांगलेच चर्चेत आले आहेत. सेमाडोह येथील गाईड युनियनचे भोला मावस्कर, अशोक मावस्कर, सूरज धिकार, मोहन धिकार, राजू सावलकर, अनिल अधिकार, राजेश सेलूकर, मन्साराम अखंडे, अविनाश मसराम, संजय सावरकर या आदिवासी युवकांनी शहरी पर्यटकांना हा संदेश दिला आहे.
बॉक्स
जंगली प्राण्यांच्या आरोग्याला धोका
जंगलात फेकलेली प्लास्टिक कॅरीबॅग सांबर, हरिण व रानडुक्कर खात असल्याचे अलीकडे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणासह वन्यजिवांची हानी टाळण्यासाठी पर्यटकांनी जंगलात असे कृत्य न करण्याचे आवाहनही या आदिवासी टुरिस्ट गाईड युवकांनी सूचना फलकांद्वारे केले आहे.
-----------------------