ग्रीन रॅलीतून पर्यावरण संवर्धनचा संदेश
By admin | Published: January 11, 2016 12:11 AM2016-01-11T00:11:34+5:302016-01-11T00:11:34+5:30
भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण, वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृती : दीड हजारांवर विद्यार्थी सहभागी
अमरावती : भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जपान येथील मारुहाची टेन्थ कार्पोरेशनचे सीईओे हिताशी सातो, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
आधुनिक युगात वाढणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाची गरज आहे. त्यादृष्ट्रीने श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मिशन आॅलिम्पिक, जपान येथील के-१३६, सामाजिक वनीकरण यानी संयुक्तारित्या ग्रीन रॅलीचे आयोजन केले. रविवारी सकाळी ८.३० वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत सायकलवर जपानचे इसाम कियामा, ताजीमा कोशिओ, जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत, डेनमार्कचे फिन बेडग्रन, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भीमराव खंडाते, गणेश मालटे, प्रायार्च स्मिता देशमुख, नगरसेविका नीलिमा काळे, सुजाता सभानेसह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रात भाऊसाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करून रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी पंचवटी चौकात पर्यावरणाविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. पंचवटी चौकातून निघालेली रॅली गर्ल्स हायस्कूल चौक, मालटेकडी, राजकमल चौक, राजापेठ मार्गे परत इर्विन चौक येथून श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात नेण्यात आली. त्या ठिकाणी रॅलीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसुळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून ग्रिन रॅलीच्या आयोजनाबाबत आयोजकांचे कौतुक केले. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय वायू सेनेतून निवृत्त झालेले दीपक आत्राम, के-१३६ चे इंडिया हेड शशांक वाडेकर, संयोजक चेतन राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रॅलीचे व्यवस्थापनाची जबाबदारी स्काऊटच्या ५२ विद्यार्थ्यांनी सांभाळली. त्यामध्ये टिम प्रमुख प्रतीक कुऱ्हेकर यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्तविक चेतन राऊत, संचालक निकिता सेवक व अनिरुध्द महाजन तर आभार प्राचार्य स्मिता देशमुख यांनी केले. (प्रतिनिधी)
अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रीन रॅली शहरातील विविध मार्गांवरून जात असताना अमरावतीकरांसाठी लक्षवेधी बनली होती. रॅलीत सहभागी असणाऱ्या सायकलस्वारांना मार्गावरील हातवारे करून चांगल्या उपक्रमासाठी दाद दिली. तसेच ग्रीन अमरावतीचा घोषणा सुध्दा केली.
ग्रीन अमरावतीच्या संदेशासाठी विद्यार्थी
फलकांसह वन्यप्राण्यांच्या वेशभूषेत
ग्रीन रॅलीत सहभागी झालेल्या तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाच्या विषयी विविध फलके हाती घेऊन जनजागृती केली. निसर्ग वाचवा, झाडे लावा, वाघ जंगलाची शान आहे, पर्यावरण संवर्धन काळाची गरज, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी हे जीवन, स्वच्छ भारत सुंदर भारत असे विविध फलके विद्यार्थ्यांच्या हाती होती. तसेच वाघ, सिंह, माकडासह अन्य वन्यप्राण्याच्या वेषभूषा विद्यार्थी होते. त्यामुळे या रॅलिला आगळवेगळे स्वरुप आले होते.