१३ ते १९ डिसेंबर दरम्यान मिथुन तारकासमुहातून उल्कावर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 09:29 PM2020-11-30T21:29:12+5:302020-11-30T21:29:41+5:30
Meteor showers Amravati News १३ ते १९ डिसेंबर या काळात मिथुन तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटे ३ ते ५ या काळात उल्कावर्षाव होईल. एका तासात सरासरी ८० उल्का पडतील. साध्या डाेळ्यांनी हा उल्कावर्षाव खगोलप्रेमींना पाहता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १३ ते १९ डिसेंबर या काळात मिथुन तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटे ३ ते ५ या काळात उल्कावर्षाव होईल. एका तासात सरासरी ८० उल्का पडतील. साध्या डाेळ्यांनी हा उल्कावर्षाव खगोलप्रेमींना पाहता येईल.
उल्कावर्षावामागे ३२०० क्रमांकाचा फेथन हा लघुग्रह कारणीभूत आहे. यावेळी पडणाऱ्या उल्केचा रंग पिवळसर असेल. ज्यावेळी लघुग्रह सूर्याला चक्कर घालून जात असतात, त्यावेळी काही भाग मोकळा होतो. हा उल्कावर्षाव म्हणजे लघुग्रहाने मागे टाकलेले अवशेष होय. काही वेळा गतिमान उल्का वातावरणातून घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यास अशनी असे म्हणतात.
उल्काशास्त्रात अशनीचे स्थान फार मोठे आहे. बाह्य अवकाशातील वस्तूंचे नमुने या अशनीमुळे आपणास मिळतात. त्यामुळे वस्तूंच्या जडणघडणीचा अर्थ आपणास लावता येतो. उल्कावर्षाव घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेर अंधारातून पाहता येईल. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी उल्कावर्षावाचे विलोभीय दृश्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.