वीजग्राहकांना स्वतःहून पाठविता येणार मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:13 AM2021-04-27T04:13:20+5:302021-04-27T04:13:20+5:30
अमरावती : वीज ग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या ...
अमरावती : वीज ग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. महावितरणचे मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन अमरावती परिमंडळच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.
महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाइज्ड बिलिंग सिस्टीम) सुरू करण्यात आल्यानंतर दरमहा १ ते २५ तारखेपर्यंत निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येणार असल्याचे महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
मीटर रीडिंग पाठविण्याची पद्धत
महावितरणच्या मोबाईल ॲपमध्ये सब मीटर रीडिंगवर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास, ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे, तो क्रमांक नमूद करावा. वीज मीटरच्या स्क्रीनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्ल्यूएच असे दिसल्यानंतरच के.डब्ल्यू किंवा केव्हीए वगळून छायाचित्र काढावे. त्यानंतर छायाचित्रानुसार मॅन्युअली रीडिंग यामध्ये नमूद करावे व सबमिट करावे. मोबाईल ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमिट करता येईल. मात्र, गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमिट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा. महाडिस्कॉम डॉट इन या संकेत स्थळावर ते छायाचित्र व मीटर रीडिंग अपलोड करायचे असल्यास लॉग इन आवश्यक आहे.