मेट्रोचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे
By admin | Published: February 1, 2017 12:05 AM2017-02-01T00:05:20+5:302017-02-01T00:05:20+5:30
मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता...
मध्य रेल्वेचे रवि राणांना पत्र : महानगरात थांबे देण्याबाबत होणार सर्वेक्षण
अमरावती: मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता मध्य रेल्वे मुंबई विभागाने हा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. प्रस्तावित मेट्रोला महानगरात थांबे देण्यासंदर्भात आ. राणांसोबत रेल्वेचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यानुसार लवकरच बडनेरा ते नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीदरम्यान मेट्रो सुरू होईल, असे संकेत आहेत.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडे
अमरावती : आ.रवि राणा यांनी निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमरावती महानगरात मेट्रो सुरू करण्याबाबत साकडे घातले आहे. त्यानुसार आ.राणांनी मध्य रेल्वे मुंबईच्या महाप्रबंधकांना बडनेरा ते एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरु करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाचे उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ यांनी मेट्रोच्या प्रस्तावाला पुढे मान्यतेसाठी रेल्वे मंत्रालयात पाठविले जाईल, असे आ. रवि राणांना १८ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे कळविले आहे.
मेट्रोच्या थांब्याबाबतही लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्याचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमिवर मेट्रो सुरु करण्याच्या मागणीने यात विकासात्मक वाढ होईल, असे आ. राणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मेट्रोच्या प्रस्तावात महानगराचा प्रमुख भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गलतच्या बडनेरा व नांदगाव पेठ या दोन शहरांना मेट्रोने जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विविध उद्योग साकारले जाणार आहेत.
औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्याना कामगार, कुशल मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे बडनेरा शहरालगतच्या गाव-खेड्यातून मोठ्या संख्येने कामगार, मजूर दरदिवशी शहरात येतात. परंतु भविष्यात नांदगावपेठ एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंद्यांना लागणारे कामगार, मजुरांना ये-जा करता यावी, यासाठी मेट्रो हे सुलभ व स्वस्त साधन ठरेल, असे आ. रवि राणा यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
या स्थळांचे होणार सर्वेक्षण
बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात मेट्रोला कुठे थांबे द्यावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बडनेरा, साईनगर, गोपालनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, कॉटनमार्केट चौक, इर्विन चौक, पंचवटी, अर्जुननगर, रहाटगाव, नांदगाव पेठ या स्थळांचे सर्वेक्षण होणार आहे.
अमरावती महानगरात मेट्रो सुरू व्हावी, ही माझी स्वप्नपूर्ती आहे. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांकडे प्रस्ताव सादर केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून मेट्रोचा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयात पाठविण्यात आल्यामुळे मार्ग सुकर झाला आहे.
- रवि राणा, आमदार, बडनेरा