एमआयडीसीमधील थकीत मालमत्तांचा आज लिलाव
By admin | Published: June 7, 2016 07:15 AM2016-06-07T07:15:48+5:302016-06-07T07:15:48+5:30
महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवीत कर थकविणाऱ्या एमआयडीसीमधील औद्योगिक मालमत्तांचा मंगळवार ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे.
उपायुक्तांच्या दालनात प्रक्रिया : करबुडव्या व्यावसायिकांमध्ये खळबळ
अमरावती : महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवीत कर थकविणाऱ्या एमआयडीसीमधील औद्योगिक मालमत्तांचा मंगळवार ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे. थकीत कर भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमक्या किती मालमत्तांचा लिलाव मंगळवारी होईल, ती संख्या सोमवार सायंकाळपर्यंत निश्चित झालेली नव्हती.
एमआयडीसी व सातुर्णा एमआयडीसीमधील ८९ मालमत्तांच्या लिलावाची नोटीस १२ मे रोजी काढण्यात आली होती. या औद्योगिक मालमत्ताधारकांकडे तब्बल दीड कोटी रूपयांचा कर थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कराच्या रकमेचा भरणा न करता महापालिकेविरोधात एमआयडीसीमधील काही उद्योजक उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान महापालिका आयुक्तांच्या आदेशाने थकीत करापोटी या ८९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या व त्यानंतर ७ जूनला दुपारी ४ वाजता या मालमत्तांचा लिलाव करण्याचे ठरले. त्यानुसार या थकीत मालमत्ताधारकांच्या औद्योगिक मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. तत्कालिन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी धाडसी निर्णय घेऊन या मालमत्तेची जप्ती व लिलावाची नोटीस काढली होती. त्या पार्श्वभूमिवर मंगळवारी किती मालमत्तांचा लिलाव होतो, की त्यांना अभय दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. जप्त मालमत्तेच्या जाहीर लिलावाबाबत नोटीस जारी केल्यानंतर उद्योग वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. लिलावाच्या भीतीपोटी अनेक उद्योजकांनी थकीत रक्कम सुद्धा भरली तर अनेकांनी रकमेचे टप्पे पाडून सवलत पदरात पाडून घेतली. त्यानंतरही ज्या थकीत मालमत्ताधारकांनी जाहीर लिलावाच्या गांभीर्याने घेतले नाही, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव मंगळवारी अपेक्षित आहे. लिलावाबाबत नवनियुक्त आयुक्त हेमंत पवार यांच्या भूमिकेकडेही महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
लिलावाच्या नोटीसनंतर ज्या मालमत्ताधारकांनी थकीत रकमेचा भरणा केला किंवा ज्यांनी सवलत मागून घेतली त्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित मालमत्तांसाठी मंगळवारी (७ जून) लिलाव प्रक्रिया घेण्यात येईल.
- विनायक औगड
उपायुक्त (प्रशासन)