रस्त्यावर मध्यरात्री बर्थ डे पार्टी करणाºयांची ठाण्यात पेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:03 PM2017-11-04T23:03:05+5:302017-11-04T23:03:31+5:30
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची रात्रकालीन गस्त काही दिवसांपासून अविरत सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर बर्थ डे पार्टी साजरी करताना काही तरुण आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची रात्रकालीन गस्त काही दिवसांपासून अविरत सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर बर्थ डे पार्टी साजरी करताना काही तरुण आढळले. सीपींनी त्या तरुणांना खडसावत दोघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यातही घेतले. त्यातच नाईट राऊन्डदरम्यान सीआर व्हॅनची तपासणी करून पोलिसांना शिस्त पाळण्याचे निर्देश दिले.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारीवर वचंक निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्वत रात्रगस्त सुरु केली. या रात्रकालीन गस्तीदरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर लक्ष केंद्रीत केले. त्या दृष्टीने सुधारणा केल्यात. दरम्यान घरफोडीच्या सत्राने पुन्हा सीपींनी रात्रकालीन गस्त घालून पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुधारणा केली. शुक्रवारी रात्री १२ वाजता सीपींचा शहराचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सर्वप्रथम गाडगेनगर रोडवर त्यांना काही तरुण रस्त्यावरच बर्थडे केक कापताना जल्लोष करताना आढळून आले. सीपींचा ताफा थांबताच त्यांतील काही तरुणांनी पळ काढला, तर दोन तरुण पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सीपींनी राठी नगरातील घरफोडीच्या घटनास्थळी भेट देऊन पोलीस गस्तीचा आढावा घेतला. तेथून वडाळीकडे जाताना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोरही काही तरुण वाढदिवस साजरा करून निघताना आढळले. याबाबत त्यांनी वायरलेसवर संदेश देऊन त्या तरुणांची झडती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार डीसीपी प्रदीप चव्हाण यांनी तरुणांना थांबविले. सीपींनी त्यांची कानउघाडणी करून पुन्हा रात्री न फिरण्याच्या सूचना दिल्यात. त्यानंतर वडाळी, महादेव खोरी, फ्रेजरपुरा, मोतीनगर, रुख्मिणीनगर, हमालपुरा, गांधी चौक, भुतेश्वर चौक, हिन्दू स्मशानभूमिकडून फेरफटका मारून रात्री ३.३० पर्यंत स्थितीचा आढावा घेतला.
शिस्तीत पोलिसिंग करण्याचे निर्देश
सीपींना महादेवखोरी मार्गावर सीआर - २ व्हॅन गस्तीवर दिसली. त्यामध्ये लाठी व शस्त्र मागील बाजूस ठेवल्याचे आढळून आले. केवळ वाहनात बसून गस्त लावून काय उपयोग, गाडीबाहेर उतरूनही पायदळ गस्त लावा व व्हिसल वाजवून पोलीस सजग असल्याचे नागरिकांना दाखवा, असे सक्त निर्देश सीपींनी पोलिसांना दिले.
सायकल पेट्रोलिंग करणाºया पोलिसांना रिवार्ड
सीपी मंडलिक यांना फ्रेजरपुरा परिसरात सशस्त्र पोलीस कर्मचारी सायकलवर पेट्रोलिंग करताना आढळून आले. नियमित कर्तव्य बजावत असलेल्या या दोघांना सीपींनी शाबासकी दिली आणि रिवार्ड घोषित केला. त्या पोलिसांच्या कामगिरीवर सीपींनी समाधान व्यक्त केले.