मध्यरात्रीच्या स्फोटाने यावली हादरले.. घरगुती साहित्याचे नुकसान, नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:28 AM2023-07-20T11:28:27+5:302023-07-20T11:40:57+5:30
ड्रेनेजलाइनमधून घरात आला गॅस? : सुदैवाने कुणीही जखमी नाही, नमुने पाठविले फॉरेन्सिकला
अमरावती : तालुक्यातील यावली शहीद येथे बुधवारी मध्यरात्री २:१५ च्या सुमारास एका घरात जोरदार स्फोट होऊन घरगुती साहित्याचे नुकसान झाले. या स्फोटाचा आवाज बराच दूर अंतरापर्यंत ऐकू गेला. त्यामुळे अर्ध्या रात्री यावलीकरांची झोपमोड होऊन त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. प्रथमदर्शनी त्या घरात कुठल्याही विस्फोटक पदार्थाचा किंवा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नसून, ड्रेनेज लाइनमधून एखादा गॅस वा वायू घरात शिरून जमा झाल्याने त्याचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
माहुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावली शहीद येथे जितेंद्र होले यांचे घर आहे. बुधवारी मध्यरात्री २:१५ वाजेच्या सुमारास होले यांच्या स्वयंपाकघरात आणि दिवाणखान्यात अचानक स्फोट झाला. या घटनेत कुणाला इजा झाली नाही, घरातील साहित्याचे नुकसान झाले. किचनमधील ओट्यावरील कडप्प्याचे तुकडे झाले, तर किचन ओट्यावरील आलमारीच्या झडपादेखील तुटल्या. या घटनेची माहिती मिळताच माहुली पोलिसांनी तत्काळ पोहोचून चौकशी सुरू केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, माहुलीचे ठाणेदार मिलिंद सरकटे, चांदूरबाजारचे ठाणेदार सूरज बोंडे, शिरखेडचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून, स्फोट कशामुळे झाला यामागील गूढ अजूनही उकलले नाही. घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या नेतृत्वातील पथकाला, ठसेतज्ज्ञांना, तसेच अमरावती येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या चमूला पाचारण करण्यात आले.
नमुने पाठविले फॉरेन्सिकला
बीडीडीएस व फॉरेन्सिक टीमने बारकाईने निरीक्षण केले असता, घटनास्थळी कुठल्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ आढळून आले नाहीत. घरगुती गॅस सिलिंडरचाही स्फोट झालेला नसल्याचे दिसून आले. ड्रेनेज लाइनमधून वायू घरात गोळा झाल्याने त्याचा स्फोट झाला असण्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. घरातील विविध वस्तूंचे नमुने तपासणीसाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
यावलीतील घटनास्थळी भेट दिली. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य निष्कर्ष काढता येऊ शकेल. घटनास्थळी कुठल्याही विस्फोटक पदार्थ वा घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला नसल्याचे दिसून आले.
- अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक, अमरावती