चिखलदऱ्यात मायलेकाची हत्या ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2015 12:44 AM2015-08-19T00:44:59+5:302015-08-19T00:44:59+5:30
तालुक्यातील आडनदी फाट्यानजीकच्या ५० फूट दरीत आई व मुलाचा अत्यंत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
१४ पासून बेपत्ता : कविठा येथील रहिवासी, आडनदीजवळी घटना
नरेंद्र जावरे चिखलदरा
तालुक्यातील आडनदी फाट्यानजीकच्या ५० फूट दरीत आई व मुलाचा अत्यंत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता सदर घटना उघडकीस आल्यावर रात्री ७.४५ वाजता दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात आली. हत्या की आत्महत्या याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
आडनदी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी १० वाजतादरम्यान वनमजूर पुरण ब्रिजलाल काळे हा लघुशंकेसाठी गेला असता त्याला दुर्गंधी आली. त्याने इतर मजुरांना ही बाब सांगितली. त्यावरुन एखाद्या जनावराचा कुजलेला मृतदेह असल्याची शक्यता वर्तविली. पुरण काळे दुर्गंधीच्या दिशेने जाऊन पाहिले असता त्याला दोन मृतदेह नग्नावस्थेत असल्याचे आढळून आले. घाबरुन त्याने पळ काढला. आठवले नामक वनकर्मचाऱ्याला सदर बाब सांगितली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
सकाळी १० वाजतापासून अज्ञात मृतदेहाची ओळख रात्री ७.४५ वाजता दरम्यान पटली. मृताची मुलगी ज्योती आमरे (रा.हिवरखेड) हिने केली. सुमित्रा लालू नागले (७५) व ऋषी लालू नागले (५५, रा. कविठा) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही आई व मुलगा असल्याचे ज्योतीने पोलिसांना सांगितले.
हत्या की आत्महत्या?
आई व मुलाचा नग्नावस्थेत कुजलेल्या स्थितीत दरीत मृतदेह आढळून आल्याने या दोघांचीही हत्या की आत्महत्या याचा खुलासा तपासात होणार आहे. दोघांचेही मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले.
संशयास्पद मृतदेह
चिखलदरा : आई व मुलाचा मृतदेह असला तरी दोघांच्या मृतदेहाजवळ पिवळ्या रंगाची अर्धवट साडी आढळून आली. एका बॉटलमध्ये पेट्रोल, आगपेटी, पिशवी, निळ्या रंगाचा सदरा, काळसर पँट आढळून आले.