विशेष घटक योजनेतून आता दुधाळ गायी, शेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:06+5:302021-02-06T04:22:06+5:30
अमरावती : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ करिता विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये ७५ टक्के अनुदानावर गायी, ...
अमरावती : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ करिता विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये ७५ टक्के अनुदानावर गायी, म्हशी व शेळींचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता लाभार्थींना २० फ्रेब्रुवारीपर्यत अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या या योजनेत लाभार्थींचा २५ टक्के हिस्सा देय राहणार आहे. यासाठी संबंधित लाभार्थींना संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत दोन दुधाळ गायी किंवा म्हशी तसेच शेळी गटवाटप असे स्वरूप आहे. यामध्ये ७५ टक्के अनुदान देय आहे व २५ टक्के अनुदान लाभार्थ्याला भरावे लागेल. दुधाळ गटात जिल्ह्यास १५६ गटांचे लक्ष्यांक असून अनुदान एक कोटी आहे. शेळी गटाकरिता जिल्ह्यास ५४६ गटांचे लक्ष्यांक असून अनुदान १.९६ कोटींचे आहे. मात्र, ही योजना अनुसूचित जातीत मोडणाऱ्या घटकासाठी राहणार आहे. यामध्ये महिलांना ३० टक्के व अपंगासाठी ३ टक्के आरक्षण राहणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर तलंगा गटवाटप योजना असून जिल्ह्यास ५०० गटांचे लक्ष्यांक आहे व याकरिता ८.३३ कोटींचे अनुदान राहणार आहे. या दोन्ही घटकांसाठी तालुक्याच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे अर्जाचा नमुुना उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे यांनी दिली.
बॉक्स
ही कागदपत्रे आवश्यक
या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जातीमधील असावा. रेशन कार्ड, रहिवासी दाखला, अपत्य दाखला, ग्रामपंचायतींचा नमुुना ८ (अ) व किमान ४० टक्के अपंग असल्याचा दाखला आवश्यक आहे. या योजनेत यापूर्वी लाभ घेतला असल्यास पुन्हा लाभ मिळणार नाही.
बॉक्स
* दुधाळ गट : ६३,७९६ रुपये शासकीय अनुदान, लाभार्थी हिस्सा २१,२६५ रुपये, एका गटाला एकूण रक्कम ८५,०६१ रुपये
* शेळी गट : ३५,८८६ रुपये शासकीय अनुदान, ११,९६२ रुपये लाभार्थी हिस्सा, ४७,८४८ रुपये एका गटाला एकूण रक्कम