दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:01+5:302021-09-16T04:17:01+5:30
अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. ...
अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. यामुळे आधीच महागाईने त्रस्त नागरिकांना मिठाईच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.
डेअरीमधून गाईच्या दुधाची ४० ते ४२ रुपये तर म्हशीच्या दुधाची ६० रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे. साखरेची किरकोळ बाजारात ४० ते ४२ आणि घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी दुधाचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मिठाई विक्रेत्यांकडून ५० ते ५५ रुपये लिटर दराने काठियावाडी व अन्य दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केली जाते. उत्पादकांना स्वीट मार्ट चालकांकडून कवडीमोल भाव दिला जात असताना मिठाईची मात्र चढ्या दरात विक्री केली जात आहे. सणासुदीत आवश्यक म्हणून ग्राहकांना भाव वाढले असतानादेखील निमूटपणे मिठाई खरेदी करावी लागत आहे. स्वीट मार्टचालकांकडून खवा पेढ्याची ३६० रुपये प्रतिकिलो, केशर पेढा ४०० रुपये प्रतिकिलो, काजूकतली ८०० रुपये प्रतिकिलो, मलाई पेढा ३६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पेढ्याच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा दिवाळी आदी महत्त्वपूर्ण सण आहेत. मिठाईचे दर असेच राहणार असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.
बॉक्स
का दर वाढले?
मागील काही दिवसांपासून दूध आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध ५० ते ६० रुपये, तर साखर ४२ ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. दुसरीकडे मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ केली आहे.
- स्वीट मार्टचालक, अमरावती
बेसन आणि डाळींच्या दरात वाढ झाली असून साखरेच्या भावातही मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची खरेदी करावी लागत आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
- स्वीट मार्टचालक, अमरावती
बॉक्स
ग्राहक म्हणतात...
जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली असतानाच सणासुदीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. मात्र, सणोत्सवाच्या काळात प्रसादासाठी खरेदी करावीच लागतात.
- कोमल बांबोडे, अमरावती
सणासुदीच्या काळात मिठाई व अन्य खाद्यपदार्थांत भेसळीची अधिक शक्यता असते. याकरिता मिठाई खरेदी करण्याऐवजी खरीच उकडीचे मोदक, मोतीचूर लाडू व अन्य मिष्टान्न तयार करण्यावर भर असतो.
- मुन्ना जोशी, अमरावती
बॉक्स
भेसळीकडे लक्ष असू द्या
- दुधापासून बनविलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ आणि रासायनिक पदार्थ वापरले जातात.
- शुद्ध तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे. बेसण पिठात लाखी या विषारी डाळीचे पीठ मिसळले जाते.
- दुधामध्ये युरिया हे खत मिसळण्यात येते. पनीरमध्येही स्टार्च मिसळला जातो. तर तुपामध्ये शिजविलेल्या बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर मिसळला जातो.
****