मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:07 PM2018-11-23T22:07:21+5:302018-11-23T22:07:51+5:30
मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत घटांग, दहिगाव, जारिदा वनपरिक्षेत्रात वनतस्करांनी हैदोस घातला आहे. यातील एकही बीट सुरक्षित नाही. घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली, भवई, भुलोरी, सलोना, मसोंडी व घटांग, जारिदा वनपरिक्षेत्रातील लाखेवाडा, बोदू, खारी, कारंज, चोबीदा, बिबा, राहू, एकताई, तर दहिगाव रेंजमधील चिंचोना, सक्ती, खिरपानी, पांढराखडक, सावरपाणी, पूर्व खैरकुंड, पश्चिम खैरकुंड, टेम्ब्रुसोंडा, गिरगुटी, अंबापाटी, खोंगडा या बीटमध्ये अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आहे. सक्ती, चिंचोना, पांढराखडक, खिरपाणी बीटमध्ये तर चोरट्यांनी हैदोस घातला आहे.
सागवान तस्करांचे एजंट सातपुडा व मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या गावागावांमध्ये कार्यरत आहेत. वनतस्कर त्यांच्याकडे आवश्यक लाकडाची आॅर्डर नोंदवितात. एजंट वृक्षतोड करणाऱ्या टोळीकडून जंगलातील सागवानची अवैध वृक्षतोड करून घेतो. तोडलेला हा माल गोळा करून तो संबंधितांना पुरविला जातो. यात ‘दादू’ दलालाची चांगलीच चर्चा आहे. हे दलाल मोबाइलवरही आॅर्डर घेतात. वृक्षतोडीकरिता १५ ते २० लोकांच्या टोळी राबते.
आडजात - बदली पास
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात कडुनिंब आणि ुबाभळीच्या लाकडाला मागणी असते. अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार येथून हे आडजात लाकूड मोठ्या ट्रकमध्ये पाठविले जाते. या आडजात लाकडासोबत संत्रा, केळी आणि कांद्याच्या ट्रकमधून या सागवान लाकडाची तस्करी केली जाते. याकरिता विशिष्ट पद्धत अवलंबिली जाते. या सागवान लाकडाची तस्करी करताना बदली पासचाही वापर केला जातो. ट्रकसोबत असलेल्या टीपीवरील माल व वन कार्यालयात असलेल्या टिपीवरील नोंदल्या गेलेल्या मालात मोठी तफावत राहते. यात कोºया टीपीचाही वापर होतो. आडजातच्या टीपीवरही सागवानची तस्करी केली जाते. बदली पास व हॅमरमध्येही तफावत असल्याचे वनविभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
चक्री मशीन
जंगलात तोडून व तेथूनच सोलून आणलेल्या या लाकडावर ९ इंची, २४ इंची चक्री मशीनवर संस्कार केले जातात. वेळप्रसंगी रंधा मशीनचाही वापर होतो. नंतर या लाकडाचे दोन्ही टोक आरीने कापून त्याला गेरू लावून अगदी कटसाईज लाकडाप्रमाणे त्याची तस्करी केली जाते.
परिपक्व वृक्षांची कत्तल
परिपक्व अशी ४५ ते ६०, ६० ते ७५, ७५ ते ९०, ९० ते १०५, १०५ ते १२०, १२० ते १३५ गोलाईची झाडे चोरटे तोडत आहेत. २० ते २५ वर्षे वयाची झाडे यात तोडली गेली आहेत. त्याखालील गोलाईच्या झाडाला चोरटे हातही लावत नाहीत. कोट्यवधीची वृक्षतोड होत असतानाही खैरियत अहवालातील माहिती आणि परिस्थितीदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थिती यात तफावत आहे. यात जंगलाचे वाटोळे आणि पर्यावरणाचे दिवाळे निघाले आहे.