सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना
By जितेंद्र दखने | Published: December 4, 2023 10:49 PM2023-12-04T22:49:05+5:302023-12-04T22:49:40+5:30
विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
अमरावती : राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसेच कागदपत्रे मागवले जातात. त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे कार्यालयात संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत तसेच शनिवारच्या शासकीय सुटीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी घेतला आहे. तसेच विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
या अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी संबंधित मंत्रालयाचे अधिकारी स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना संपर्क करतात. वास्तविक काही वेळा सुटी असल्याने उत्तरे मिळत नाहीत, याशिवाय तसेच सुटीच्या दिवशी मंत्री व अधिकारी यांचे दौरेही जिलह्यात असतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओंनी शनिवारच्या शासकीय सुट्या रद्द केल्या आहेत व कार्यालय सुटण्याच्या वेळपेक्षा अर्धा तास मुख्यालयात थांबावे, अशा सूचना दिल्या आहेत.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे मागविली जातात. ज्या ज्या विभागाचे संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने विधिमंडळाने माहिती मागविली आहे. ती माहिती तसेच वेळेवर लागणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने खातेप्रमुख, कर्मचारी यांनी अधिवेशन कालावधीत मुख्यालय सोडू नये, तसेच सुटीच्या दिवशी कार्यालयात हजर राहावे, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
- डॉ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन विभाग जि. प.