गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

By admin | Published: April 25, 2016 12:10 AM2016-04-25T00:10:40+5:302016-04-25T00:10:40+5:30

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत.

The Minister of Home Affairs tortured the Police Commissioner | गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

Next

गोवंश हत्या, वाहतूक प्रकरण : गंभीर आरोप
अमरावती : महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत. यात पोलिसांचेही साटे-लोटे असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला होता.
याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हे बेकायदेशीर कृत्य थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयी विचारणा केली होती. शिष्टमंडळात मुस्लिम समाजातील कुरेशी समाजाच्या स्लॉटरिंग परमिट होल्डर्स अँड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशीदेखील उपस्थित होते. शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरात सुमारे १५ जण गोमांसाचा व्यवसाय करतात. यासाठी गोवंशाची कत्तल केली जाते. त्यांच्या पाठीशी एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाचा वरदहस्त आहे. सुमारे दोन ट्रक गोमांस दिवसाकाठी शहरातून पाठविले जाते.
विशेष म्हणजे पूर्वी गोमांसाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी राज्य सरकारने कायदा केल्यानंतर गोवंश हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील कोणी गोवंश हत्या केली तर त्याला सोसायटीच्यावतीने ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठरवण्यात आली आहे. परिणामी नागपुरी गेट आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये गोवंशहत्या बंद आहे. पण, पोलिसांचे साटेलोटे असल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनीत आजही हा व्यवसाय सुरूच आहे. गोमांसाची वाहतूक बंद करा, अशी मागणी बीफ मर्चंट सोसायटीने वारंवार करूनही अमरावती पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. पोलिसांचे तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांचे खिसे गरम करतो, अशी बतावणी गोमांसाचा व्यापार करणारे खुलेआम करतात, असा आरोपही शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांकडे केला होता.
पुढील आठवड्यात शहरातील हा गोवंश हत्येचा व्यवसाय पूर्णपणे न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या एका पोलीस निरीक्षकांच्या नावे सतत तक्रारी केल्या जात आहेत. राज्य सरकार गोवंश रक्षणाच्या विषयावर गंभीर असताना अमरावतीमध्ये गोमांसाचा व्यवसाय होत असेल तर पोलीस प्रशासन त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे. या संदर्भात कडक पावले उचलण्याचे निर्देश रणजित पाटील यांनी दिले आहेत.
शुक्रवारी पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात स्लॉटरिंग परमीट होल्डर्स अ‍ॅन्ड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशी, पदाधिकारी जायद हुसैन कुरेशी, जाकीर हुसैन कुरेशी यांच्यासह विहिंपचे विजय शर्मा, भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस चेतन गावंडे, प्रभाकर थेटे, अभय बपोरीकर, भारत चिखलकर, प्रसाद जोशी, राजू कुरील, बादल कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना या विषयावर सचेत केल्यावर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. काल पोलिसांनी गस्त वाढविताच आझादनगरात हा धंदा करणाऱ्यांनी सारवासारवीचे प्रयत्न चालवले आहे. शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेली ही गोमांस वाहतूक तातडीने न थांबविल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणाला गांभिर्याने घेतल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Minister of Home Affairs tortured the Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.