प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांड : गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली प्रतीक्षाच्या कुटुंबीयांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 02:22 PM2017-11-25T14:22:14+5:302017-11-25T14:22:18+5:30
अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
अमरावती : अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
नेमके काय आहे घटना ?
‘माझी होणार नसशील तर..!’ हा चित्रपटात शोभणारा खुनशी इशारा खरा करणा-या राहुल भडला गुरुवारी ( 23 नोव्हेंबर ) रात्री पोलिसांनी मूर्तिजापूर येथून अटक केली. त्यावेळी तो विष प्राशन केलेल्या अवस्थेत होता. नांदण्यास तयार नसलेल्या पत्नीची त्याने त्यापूर्वी सकाळी अमरावतीच्या साईनगर भागात चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. राहुल बबनराव भड (रा.हंतोडा, ता. अंजनगावसुर्जी) याच्या पाळतीवर असलेल्या अमरावती पोलिसांच्या पथकाने मोबाइल लोकेशनच्या आधारे मूर्तिजापूर गाठून त्याला अटक केली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुलकडून हत्येसाठी वापरलेला चाकू व वाहन जप्त करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहेत.
अमरावती येथे वास्तव्यास असलेला राहुलने प्रेम प्रकरणातून प्रतीक्षा मेहत्रे या युवतीशी 10 ऑक्टोबर 2013 रोजी गुपचूप लग्न उरकले. यशोदानगरातील देव महाराज संस्थानात हिंदू रितीने विवाह पार पडला. यासंबंधाने त्याने नोटरीसुद्धा केली आहे. मात्र, यानंतर प्रतीक्षा तिच्या माहेरीच राहत होती. दोघांनी लग्न केल्याचे प्रतीक्षाच्या आई-वडिलांनाही माहिती नव्हते. यादरम्यान एकदा राहुलने प्रतीक्षाला मागणी घातली. मात्र, तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. राहुलने प्रतीक्षाच्या कुटुंबीयांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा विरोध ठाम होता. प्रतीक्षानेही राहुलसोबत जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे राहुलने प्रतीक्षासोबत लग्न झाल्याचा दावा करीत कौटुंबिक न्यायालयात प्रकरण नेले. एक तर नांदायला ये, नाही तर सोडचिठ्ठी दे, असे त्याने कळविले. दुसरीकडे तिचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. या कालावधीत प्रतीक्षाने राहुलविरोधात पाच पोलीस तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे राहुलच्या मनात प्रचंड राग धुमसत होता.
हत्येपूर्वी प्रतीक्षाच्या वडिलांना धमकी
प्रतीक्षाच्या हत्येच्या एक दिवसापूर्वी राहुलने पुन्हा तिच्या वडिलांना धमकी दिली. याबाबत फे्रजरपुरा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. यानंतर गुरुवारी राहुलने प्रतीक्षाला साईनगरातील वृंदावन कॉलनी परिसरात गाठले आणि चाकूचे नऊ वार करून तिची हत्या केली.