राज्यमंत्री बच्चू कडू तिसऱ्यांदा विलगीकरणात, ताप अंगदुखी असल्यानं केली टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 07:42 AM2021-03-28T07:42:04+5:302021-03-28T07:42:35+5:30
बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे.
अमरावती/मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांसंख्या वाढल्याने राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले होते. तर, राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील दोनवेळा कोरोना होऊन गेला आहे. आता, पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्याने पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असे ट्विट कडून यांनी केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी दोनवेळा बच्चू कडू यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यावेळी, विलगीकरणात जाऊन उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले होते.
माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे पुढील ३ दिवस कृपया कोणीही न विचारता भेटायला येऊ नये. ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली ती निगेटिव्ह आली आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्यामुळे पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 27, 2021
फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह
"माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी" असं आवाहन बच्चू कडू यांनी 19 फेब्रुवारी रोजी ट्विट करुन केलं होतं. अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, 19 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. रविवारी रात्री ८ वाजेपासून जमावबंदी लागू करताना ती मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल. विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड पडेल. रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत या जमावबंदी लागू असल्याच्या काळात उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्स, सर्व सिनेमागृहे, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत.