आश्रमशाळेत कोरकू, पारधी भाषेतून पहिली-दुसरीचे शिक्षण, मंत्री विजयकुमार गावित यांची घोषणा
By गणेश वासनिक | Published: April 17, 2023 06:28 PM2023-04-17T18:28:10+5:302023-04-17T18:33:40+5:30
येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
अमरावती : आदिवासी, पारधी समाजातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी त्यांच्याच बोली भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षात पहिली आणि दुसरीचे शिक्षण कोरकू, पारधी भाषेतून दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सोमवारी येथे केली.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पारधी-फासेपारधी समाज जनजागृती मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ना. गावित बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार रमेश बुंदिले, रमेश मावस्कर, संजय हिंगासपुरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, धारणीचे प्रकल्प अधिकारी सावनकुमार, बाबुसिंग चव्हाण, मतीन भोसले, सलिम भोसले, रंजिता भोसले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. गावित म्हणाले, आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्थानिक बोली भाषेतून पहिली आणि दुसऱ्या वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर ऑडिओ, व्हिडीओद्वारे शिक्षण देताना आदिवासी, पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा या उपक्रमामागे हेतु आहे. काेरकु, पारधी भाषेचे शिक्षण देण्यासाठी स्थानिक शिक्षकांनाच प्राधान्य देण्यात येईल. परंतु आदिवासी, पारधी महिलांनी आपली मुले आश्रमशाळा, वसतिगृहात शिक्षणासाठी गेली पाहिजे, याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन ना. गावित यांनी स्पष्ट केले.
ॲपद्वारे माहिती जाणून घेणार
आदिवासी विकास विभागात विविधांगी योजना, उपक्रम राबविले जातात. त्याकरिता आता आदिवासी मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार आदींबाबत एका ॲपद्वारे माहिती गोळा केली जाणार आहे. आवडी-निवडीनुसार एक किंवा दोन महिन्यात संबंधितांना प्रशिक्षण दिले जाईल. पारधी समाजाच्या घरकुलाचा प्रश्न सोडविला जाणार असून, येत्या दोन वर्षात एकही पारधी घरकुलविना राहणार नाही असे, असे ना. गावित यांनी सांगितले.
आवडेल ते करा, मागेल ते देवू
पारधी समाज आता रस्त्यावर भीक मागताना नव्हे तर शिक्षण, रोजगार, नोकरीदार, व्यावसायीक झाला पाहिजे. म्हणून आवडेल ते करा, मागेल ते देवू, अशी संकल्पना आदिवासी विकास विभागाची आहे. महिलांनो बचत गट तयार करा. येत्या तीन महिन्यात साहित्य, धनादेश वाटप करू, असे आश्वासन ना गावित यांनी दिले.