तर मंत्रालयात, कृषी सचिवांच्या कार्यालयात 'फवारणी'करू - आ. बच्चू कडू यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 04:51 PM2017-10-03T16:51:14+5:302017-10-03T16:52:36+5:30
शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.
यवतमाळ - शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.
या अवस्थेत मृतकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची सरकारने तातडीने मदत करावी, विषबाधा झालेल्याना प्रत्येकी १ लाख रुपये सानुग्रह मदत करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केली. जर शासन मदत करत नसेल तर मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात आपण त्यात कीटकनाशकांची फवारणी करू असा इशारा त्यांनी दिला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दि.२ ऑक्टोबर रोजी आ. बच्चूभाऊ कडू यांनी यवतमाळ येथे येऊन विषबाधा झालेल्या शेतकरी,शेतमजुरांच्या प्रकृतीची यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयात विचारपूस केली केली. रात्री ८ वाजता च्या सुमारास आमदार कडू जिल्हा रुग्णालयात पोहचले त्यानी उपचार घेत असलेल्या शेतकरी,शेतमजुरांच्या प्रकृतीची विचारपूस करून उपस्थित डॉक्टर कडून या संदर्भात माहिती घेतली.
शेकडो रुग्ण विषबाधित झाल्या नंतर सुद्धा गरीब रुग्णांना 'बाहेरन औषध'आणावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या सोबत प्रहार चे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यवतमाळ जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे,विलास पवार,जिल्हासंपर्क प्रमुख आशिष तुपटकर,उपजिल्हाप्रमुख नितीन महल्ले,चंद्रकांत बोरले,आकाश चिंचोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार बच्चूभाऊ कडू यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देण्यापूर्वी घाटंजी तालुक्यातील आकपुरी येथील आत्महत्याग्रस्त दोन शेतकरी कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले. त्या नंतर टिटवी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट दिली.
सरकार 'मरणात'सुद्धा भेदभाव करत आहे
मुंबईत रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते सर्व कस्टकरी होते. त्यांना राज्य सरकारने तातडीने ५ लाख रुपयांची व रेल्वे प्रशासनाने ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली. तर दुसरी कडे यवतमाळ जिल्ह्यात कस्टकरी शेतकरी व शेतमजुरांच्या जीवाचे मोल सरकारला का कळत नाही..?
शेतातील पिकं वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणारे २० अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर आपला जीव गमावतात शेकडो शेतकरी, मजूर मृत्यूशी झुंज देत आहेत मात्र सरकार व जिल्हाप्रशासन पाहू,चौकशी करू अशा थापा मारण्यात वेळ घालवत आहे. शहरी व ग्रामीण असा भेद करणाऱ्या सरकारने कस्टकरी माणसांच्या मरणात सुद्धा भेद करत असल्याचा आरोप बच्चूभाऊ कडू यांनी केला.