उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय उपक्रम आता जिल्हास्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 05:00 AM2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:01:00+5:30
आतापर्यंत चार हजारहून अधिक तक्रारींचे निवारण झाले. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्न सोडवण्यासाठी हा उपक्रम सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@उपक्रम विभागस्तरीय सहसंचालक कार्यालयांनीही जिल्ह्या-जिल्ह्यात राबवावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिले.
‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@अमरावती’ हा अभिनव उपक्रम ना. सामंत यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार प्रवीण पोटे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, कला संचालक राजीव मिश्रा, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, ग्रंथालय संचालक डॉ. शालिनी इंगोले, सहसचिव दत्तात्रय कहार, उपसचिव अजित बाविस्कर, कुलसचिव तुषार देशमुख उपस्थित होते.
ना.सामंत म्हणाले, आतापर्यंत चार हजारहून अधिक तक्रारींचे निवारण झाले. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्न सोडवण्यासाठी हा उपक्रम सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. सहसंचालक कार्यालयांनी पुढाकार घ्यावा व जिल्ह्याजिल्ह्यात दर दोन महिन्यांनी शिबिरे घ्यावीत. या उपक्रमाबाबत पुनरावलोकन व आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे सामंत म्हणाले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले.