पोटदुखीने फुटले अतिप्रसंगाचे बिंग; आरोपीला अटक
By प्रदीप भाकरे | Published: July 6, 2023 12:50 PM2023-07-06T12:50:53+5:302023-07-06T12:53:37+5:30
मुलगी अल्पवयीन : बलात्कारानंतर गर्भधारणा
अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा झाली. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश सुभाष खोबरागडे (२७, रा. कापुसतळणी, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूध्द बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. ५ जुलै रोजी रात्री १०.४६ च्या सुमारास गुन्हा दाखल करताच आरोपीला अटक करण्यात आली.
तक्रारीनुसार, दोन वर्षांपुर्वी पिडिता ही दहावीत असताना तिची आरोपीशी ओळख झाली. दोघांमध्ये सोशल मिडीयावर चॅटिंग सुरू झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तिच्या अल्पवयीन असण्याचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखविले. तू अठराची झालीस की, आपण लग्न करू, अशी बतावणी करून त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. मात्र, ती बाब तिने कुणालाही सांगितली नाही.
डॉक्टरांच्या तपासणीत निघाली गर्भार
दरम्यान, तिने आईकडे पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे कुटुंबियांनी तिला अकोला येथील एका रूग्णालयात तपासणीला नेले. तेथे सोनोग्राफी केली असता, ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते ऐकून पिडितासह तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. तेथील डॉक्टरांनी तो प्रकार अकोला येथील स्थानिक पोलीस ठाण्याला कळविला. तथा महिला बालकल्याण समितीला देखील पाचारण करण्यात आले. पिडिताचे समुपदेशन केल्याानंतर तिने खरा तो प्रकार सांगितला. दरम्यान घटनास्थळ रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तो गुन्हा अकोला पोलिसांकडून रहिमापूर ठाण्यात वर्ग करण्यात आला.
१७ वर्षीय पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करवून घेतला. घटनेचे गांभिर्य पाहता आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.
- निलेश देशमुख, ठाणेदार, रहिमापूर