अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 09:41 PM2017-09-24T21:41:51+5:302017-09-24T21:42:18+5:30
अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री गणोजादेवी शेतशिवारात उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री गणोजादेवी शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भातकुली ठाण्यावर धडक देऊन आरोपींच्या अटकेची मागणी रेटून धरली. यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
विलासनगरातील एक १७ वर्षीय मुलगी आठव्या वर्गात शिकत असून तिला सागर नामक एका आॅटोरिक्षाचालकाने प्रेमजाळ्यात अडकवले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. सागरने यादरम्यान तिच्याशी अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. फे्रजरपुरा हद्दीतील एका मित्राच्या खोलीवर नेऊन सागरने बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. शनिवारी दुपारी पीडित मुलगी अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेली. तेथे तिला सागर भेटला. त्याने आॅटोरिक्षात बसवून तिला बडनेरा रोडवर नेले. एकांत पाहून तिच्यावर बलात्कार केला.
चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन
त्यानंतर सागरने तिला नागपुरी गेट परिसरात नेले. तेथे त्याचा मित्र नवाब खान अजीज खान (३५,रा.अलीमनगर) हा त्यांची वाट पाहत उभाच होता. त्यानंतर सागर, नवाब व त्याचे दोन मित्र असे चौघे जण पीडितेला घेऊन गणोजादेवी शेतशिवाराकडे निघाले. तेथेही अत्याचार करण्यात आला. हा प्रकार नागरिकांच्या समजताच त्यांनी धाव घेतली. नवाब खान हा नागरिकांच्या हाती लागला, तर अन्य तरूणांनी तेथून पलायन केले. नवाबला भातकुली पोलिसांच्या स्वाधीन केले. सामूहिक या घटनेनंतर तणावसदृश स्थिती उत्पन्न होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपी नवाब व पीडितेला कोतवाली पोलीस ठाण्यात पाठविले.
दोघांना अटक
सामूहिक बलात्कारप्रकरणात भातकुली पोलिसांनी शनिवारी रात्री नवाब खानला अटक केली, तर रविवारी सकाळी सादिक शहा गफ्फूर शहा (३०, रा. गणोजा देवी) याला अटक केली. पीडितेला जयस्तंभ चौकातून आरोपींनी नेले होते. त्यामुळे पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
पीडितेला आरोपीने अंबादेवी परिसरातून आॅटोरिक्षात बसवून नेले आणि भातकुली मार्गावरील शेतशिवारात लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे