बालविवाह, बळजबरी अन् मुलाला जन्म; जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर उघड झाली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2022 02:46 PM2022-09-08T14:46:04+5:302022-09-08T14:50:29+5:30
बलात्कार, पोक्सोचा गुन्हा दाखल
अमरावती : बालविवाहानंतर पतीने केलेल्या शारीरिक बळजबरीतून एका अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना येथे उघड झाली. या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी दुपारी आरोपी निकेश (१९, ता. अमरावती) याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळ हे माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तो गुन्हा त्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीने पुरुष जातीच्या अर्भकास जन्म दिल्यानंतर ही घटना उघड झाली. आरोेग्य यंत्रणेने आधार कार्डची पाहणी करून त्याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. जिल्हा स्त्री रुग्णालयात पीडितेने दिलेल्या बयाणानुसार, ती १६ वर्षांची असताना जानेवारी २०२१ मध्ये अमरावती तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय निकेशशी तिचा विवाह लावून देण्यात आला. या बालविवाहानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक बळजबरी केली. त्यातून ती गर्भवती राहिली. तिला प्रसवकळा येऊ लागल्याने ४ सप्टेंबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. दाखल करतेवेळी रुग्णालय व्यवस्थापनाने तिची जन्मतारीख पाहिली असता, ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याबाबत गाडगेनगर पोलीस व बाल संरक्षण कक्षाला माहिती दिली.
एसीपीने नोंदविले बयाण
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी डफरीन गाठून पीडितेकडून एकंदरीत घटनाक्रम जाणून घेतला. तिने तेथे दिलेले बयाण पोलीस दप्तरी नोंदवून घेतले. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले हेदेखील उपस्थित होते. तपासाची डायरी माहुली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.