अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार प्रकरण : दोघांना दहा वर्षांची, तर एकाला पाच वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 07:33 PM2017-12-27T19:33:04+5:302017-12-27T19:33:15+5:30
दहावीच्या पेपरला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणा-या एका तरुणास पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
अमरावती : दहावीच्या पेपरला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणा-या एका तरुणास पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. राहुल ऊर्फ गोलू राजू रावेकर (२४), संदीप रामदास रावेकर (२४), मंगेश विष्णू कुकडे (२४, सर्व रा. वाठोडा शुक्लेश्वर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) एस.डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयाने बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
खोलापूर (ता. भातकुली) येथे १५ वर्षीय मुलगी २४ मार्च २०१४ रोजी दहावीच्या पेपरसाठी गेली होती. मंगेश कुकडे याने तिला दुचाकीवर बसवून मूर्तिजापूर मार्गे अकोला येथे राहुलजवळ पोहचविले. राहुलने तिला ठाणे, सुरत शहरात फिरवून अहमदाबादला नेले. तेथे खोली भाड्याने करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात राहुलला नीलेश रावेकर, शुभम रावेकर व मंगेश यांनी मदत केली. पीडिताच्या वडिलांनी दुसºयाच दिवशी खोलापूर पोलीस ठाण्यात मुलगी पळविल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.आर. ताले यांनी चौकशी पूर्ण करून १४ नोव्हेंबर २०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता प्रशांत देशमुख यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने राहुल व मंगेशला भादंविच्या कलम ३६३ अन्वये तीन वर्षे कैद, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम ३६६ (अ) अन्वये पाच वर्षे कैद, एक हजाराचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. राहुलला भादंविच्या कलम ३७६ (२) नुसार दहा वर्षे कारावास आणि दोन हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. शुभम व नीलेश यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
अन्य एका प्रकरणात १६ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत २४ मार्च २०१४ रोजी दहावीच्या पेपरसाठी भातकुली येथे गेली होती. पेपर संपल्यानंतरही ती घरी न परतल्याने वडिलांनी २५ मार्च रोजी पोलिसांत तक्रार नोंदविली. भातकुली पोलिसांनी संदीप रामदास रावेकर (२५, रा. वाठोडा शुक्लेश्वर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस चौकशीदरम्यान भाऊ दिलीप (३०) याने राहुलच्या बँक खात्यात पाच हजार रुपये टाकल्याचे पुढे आले. पोलिसांनी चौकशी करून संदीप रावेकर व राहुल रावेकर यांना अहमदाबादवरून अटक केली. त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलीसुद्धा होत्या. चौघांनाही घेऊन पोलिसांनी अमरावती गाठले. मुलींच्या बयाणावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६, १२० (ब), १०९, पोक्सो कलम ४, ६, १२ अन्वये गुन्ह्यात वाढ केली. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी न्यायालयात चार साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपी संदीपला कलम ३७६ अन्वये दहा वर्षांची कैद, दोन हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास ठोठावला. याप्रकरणात दिलीप रावेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून मनोज भोंडे यांनी कामकाज पाहिले.
संदीप रावेकर पूर्वीच्या एका प्रकरणात भोगतोय शिक्षा
संदीप रावेकर याच्याविरुद्ध २०१३ मध्ये छेडखानीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. सोबत २१ हजारांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला होता. त्यामुळे तो कारागृहात शिक्षा भोगत असून, बुधवारी झालेल्या न्यायालयीन निर्णयात आता दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.