नांदगाव तालुक्यात गौण खनिजांची चोरी
By admin | Published: January 11, 2015 10:43 PM2015-01-11T22:43:41+5:302015-01-11T22:43:41+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरुम, दगड आणि गिट्टीच्या खदानी आहेत. परंतु खदाणीवरुन रोज शेकडो ट्रक गौण खनिज विनापरवाना खदानीवरुन घेऊन जात असल्याने शासनाला
मनीष कहाते - वाढोणा रामनाथ
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरुम, दगड आणि गिट्टीच्या खदानी आहेत. परंतु खदाणीवरुन रोज शेकडो ट्रक गौण खनिज विनापरवाना खदानीवरुन घेऊन जात असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहे. याकडे तलाठी आणि मंडळ अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेने केला आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी गिट्टी खदान अमरावती - यवतमाळ महामार्गावर असलेल्या जळू, धानोरा जोग आणि टिमटाळा येथे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महसूल विभागाने वरील तीनही गिट्टीचे खदान एकाच व्यक्तीला चालविण्याकरिता दिले आहेत. त्यामुळे महसूल विभागाचे एकाच व्यक्तीवर एवढे प्रेम का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खदानीवरुन रोज शेकडो ट्रक गिट्टी विनारायल्टी अथवा एकच रायल्टी पास संपूर्ण दिवसभर गिट्टी ट्रकधारक चालवीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गिट्टीच्या माध्यमातून शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. यामध्ये मंडळ अधिकारी आणि संबंधित तलाठी सहभागी असल्याचे आहे. त्यामुळे राजरोसपणे वाहतूक सुरू असल्याचे नागरिक सांगतात.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा, सालोड, शिवरा, फुबगाव, लोणी टाकळी, पिंपळगाव निपानी यासह छोट्या मोठ्या मुरुम आणि दगडाच्या खदानी बहुतांश गावांमध्ये आहेत. परंतु गौणखनिजाची एका ट्रकची परवानगी तहसील कार्यालयामधून ठेकेदार प्राप्त करतात आणि एका ट्रकच्या परवानगीवर कित्येक ट्रक जेसीबीच्या सहाय्याने भरुन वाहतूक करतात. हा प्रकार सर्रास सुरू आहे. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज असताना मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी होत आहे. अवैध मार्गाने गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार जातात तेव्हा तहसीलदार पोहचण्यापूर्वीच संबंधितांना फोन करुन माहिती देण्यात येते. यामध्ये काही महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठीसुद्धा सहभागी असल्याची माहिती आहे. त्यामुळे चोरटे वाहने पकडायचे कसे आणि कारवाई करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.