अल्पवयीन म्हणाला, कुछ ‘हटके’ करना है!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:13 AM2021-07-28T04:13:45+5:302021-07-28T04:13:45+5:30
अमरावती : सोनू, मोनू, दीप यांचे ते अल्पवयीन तिघेही अगदी जिगरी दोस्त. फेसबुकवरील एका विशिष्ट नावाच्या ग्रुपमधील सदस्य. तीनपैकी ...
अमरावती : सोनू, मोनू, दीप यांचे ते अल्पवयीन तिघेही अगदी जिगरी दोस्त. फेसबुकवरील एका विशिष्ट नावाच्या ग्रुपमधील सदस्य. तीनपैकी एका अल्पवयीनने ‘बैठकीत’ कुछ हटके करना है, अशी मनातील इच्छा बोलून दाखवली. ती सोनू, मोनूने उचलून धरली. अंशुल इंदूरकरशी आपली जुनी खुन्नस आहे, त्याला संपवून टाक, तुला ‘हटके’ करता येईल, असे त्या अल्पवयीनाला सांगितले. त्याने मागचा-पुढचा विचार न करता अन्य दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन अंशुलचा भरचौकात ‘गेम’ केला. हा धक्कादायक प्रकार आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान उघड झाला.
२५ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास अंशुल बाळू इंदूरकर (२३, रा. कल्याणनगर गल्ली नं. ६) याचेवर मोतीनगर चौकात चायना चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोनू प्रभुदास पवार व मोनू प्रभुदास पवार या दोन भावडांच्या सांगण्यावरून हा रक्तरंजित खेळ खेळण्यात आला. चाकू पुरविणारा दीप कपिले हादेखील कटात सहभागी झाला. त्याने यातील अल्पवयीन मुलाला चाकू आणून दिला. तो चाकू अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. केवळ मैत्री व ‘कुछ हटके’ करण्याच्या वेड्या नादात हा खून घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या ‘मर्डर‘साठी हल्लेखोरांनी आरोपींकडून मोबदला घेतला नाही, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
चाकू मिळेना
फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्यक्षात घटनेत सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे कपडे, शर्ट, चपला आदी वस्तू जप्त केल्या. अद्याप गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आलेला नाही. पोलीस कोठडीदरम्यान चाकू व दुचाकीचा शोध घेण्यात येणार आहे.
कोट
‘कुछ हटके करना है, अशा आशयाचे बयाण आरोपींच्या कबुलीजबाबातून आले आहे. कोठडीदरम्यान अनेक बाबींचा उलगडा होईल. घटनेत वापरलेला चाकू अद्याप जप्त व्हायचा आहे.
- नितीन मगर, पोलीस निरीक्षक
फ्रेजरपुरा