सीसीटीव्ही फुटेजची ‘मिनिट टू मिनिट’ तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:59+5:302021-08-23T04:15:59+5:30
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यातील सागर ठाकरेच्या ‘डेथ ईन कस्टडी’प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजची ‘मिनिट टू मिनिट’ तपासणी करण्यात ...
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यातील सागर ठाकरेच्या ‘डेथ ईन कस्टडी’प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजची ‘मिनिट टू मिनिट’ तपासणी करण्यात येणार आहे. या सूक्ष्म तपासणीवरून संपूर्ण घटनाक्रमाचा कालावधी व अनुषंगिक बाबींचा उलगडा होणार आहे.
१९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या सुमारास आरोपी सागर ठाकरे (२४) याने राजापेठ पोलीस ठाण्यातील लाॅकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. घटनेनंतर लगेचच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीआयडीच्या उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी १७ ऑगस्टच्या दुपारपासून १९ ऑगस्ट रोजीच्या आत्महत्येच्या घटनेपर्यंतचे राजापेठ व फ्रेजरपुरा ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. अनुषंगिक पोलिसी दस्तावेजदेखील ताब्यात घेतला. सीआयडीने तपासाला गती दिली आहे. राजापेठ व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील सर्वच संबंधितांचे बयाण नोंदविले जाणार आहे. पैकी डझनभर अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे.
फुटेजची खातरजमा
राजापेठ ठाण्यातील हवालातीत मागील भिंतीला सीसीटीव्ही आहे. त्यामुळे समोरील सर्व घटनाक्रम व त्यात असलेल्या दोन्ही आरोपींच्या संपूर्ण हालचाली त्यात टिपल्या गेल्या आहेत. अनेकदा फुटेजमध्ये आरोपींची पाठ दिसून येते. आरोपी सागर ठाकरे याने आत्महत्येपूर्वी लॉकअपमधील भिंतीवर काही लिहिल्याची माहिती समोर आली आहे. लॉकअपमधील भिंतीवरील काळपट झालेल्या चुन्यावर व्हाईटवॉश मारण्यात आला. त्यावर अनेक आरोपीने कोरून ठेवले आहे. त्यामुळे आरोपी सागरने नेमके काय लिहिले, कोणत्या वेळात लिहिले, त्याने लिहिले की कसे, हे तपासण्यासाठी फुटेज ‘मिनिट टू मिनिट’ पाहिले जाणार आहे.
राजापेठ लॉकअप ‘लाॅक’
१९ ऑगस्टच्या दुपारपासून राजापेठचे लॉकअप बंद आहे. त्यात पीसीआरच्या वा अन्य कुठल्याही आरोपीला ठेवण्यात आले नाही. उपलब्ध पुराव्याशी छेडछाड होऊ नये, यासाठी ते बंद ठेवल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळ विनाअडसर पाहता यावे, हादेखील त्यामागील उद्देश आहे.
कोट
राजापेठ ठाण्यातील ‘डेथ इन कस्टडी’ प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ‘मिनिट टू मिनिट’ पाहणार आहोत. त्यातून एकूणच घटनेचा, वेळेचा, हजर गैरहजेरीचा उलगडा होईल. तपास वेगाने सुरू आहे.
दिप्ती ब्राम्हणे, उपअधीक्षक,
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती