‘समृद्धी’वरील टोल नोकरभरतीत दिशाभूल; सोशल मीडियावर रिझ्युमची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 01:57 PM2022-10-10T13:57:52+5:302022-10-10T13:58:41+5:30

लोकमतने आणला प्रकार उघडकीस

misguidance in toll collector recruitment on Samruddhi highway; Demand for resumes on social media | ‘समृद्धी’वरील टोल नोकरभरतीत दिशाभूल; सोशल मीडियावर रिझ्युमची मागणी

‘समृद्धी’वरील टोल नोकरभरतीत दिशाभूल; सोशल मीडियावर रिझ्युमची मागणी

googlenewsNext

धामणगाव रेल्वे (अमरावती) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर टोल कलेक्टर भरतीच्या नावावर समाज माध्यमावर रिझ्युम मागविले जात आहेत. बारावी उत्तीर्ण, एमएससीआयटी पात्रता यासाठी सांगितली जात आहे. तथापि, या पदांवर कुठलीही भरती अद्याप निघालेली नसून राज्यातील शेकडो बेरोजगारांची सोशल मीडियावर याद्वारे दिशाभूल होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्याला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या अंदाजे ५५ हजार कोटींच्या निधीतून ७१० किमी लांब बांधलेला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या महामार्गावरील २६ नाक्यांवर पथकर (टोल) वसुलीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने निविदा मागविली. कंत्राटदाराच्या नियुक्तीसंदर्भातील कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. त्याचा फायदा घेत या टोलवर संगणक ऑपरेटर भरतीच्या नावावर सोशल मीडियावरून बेरोजगारांची दिशाभूल होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

व्हॉट्सॲपवर मागवले रिझ्युम

महामार्गावरील एका टोलवर कलेक्टर भरती सुरू असून येथे २५ जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व एमएससीआयटी हवी, अशी सोशल मीडियावर पोस्ट करीत एक व्यक्ती स्वतःच्या व्हाॅट्सॲपवर रिझ्युम मागवत आहे. शेकडो बेरोजगारांनी या क्रमांकावर आपले रिझ्युम पाठवले आहे. मात्र, याला प्रशासकीय कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमतने उघडकीस आणला घोळ

सोशल मीडियावर रिझ्युम मागणाऱ्या मोबाइल क्रमांकावर लोकमतने विचारणा केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यानंतर लगेच अमरावती, मुंबई येथील एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर ज्या कंपनीला हा कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्याच्या संचालकांशी संवाद साधला. आपण आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केली नसून टोल नोकरभरतीसंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात देऊन नियमाप्रमाणे ती राबविण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीच्या संचालकांनी सांगितले. याशिवाय अशा सोशल मीडियाच्या पोस्टकडे युवकांनी लक्ष देऊ नये, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

टोल कंत्राटदार नियुक्तीसंदर्भातील कार्यारंभ आदेशाची प्रक्रियाच अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नोकरभरतीचा प्रश्न नाही. संबंधित टोलवर नोकरभरती करताना कंत्राटदार कंपनीकडून वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊनच ती करण्यात येईल. त्यामुळे कोणीही अशा नोकरभरतीसाठी आपली कागदपत्रे देऊ नयेत.

- योगेश गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, मुंबई

Web Title: misguidance in toll collector recruitment on Samruddhi highway; Demand for resumes on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.