अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार, पत्रकारितेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी प्रश्नपत्रिका
By उज्वल भालेकर | Published: June 14, 2023 06:10 PM2023-06-14T18:10:57+5:302023-06-14T18:17:01+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ च्या परीक्षा सुरु आहेत.
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाचा परीक्षेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. बुधवारी एम.एम पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाच्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे हिंदीतील प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी संबधित प्रश्नांचे गुणदान देण्याची मागणी विद्यापीठाच्यापरीक्षा विभागाकडे केली आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ च्या परीक्षा सुरु आहेत. बुधवारी एम.ए पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचा जाहिरात आणि माध्यम या विषयाचा पेपर होता. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाची निवड केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न मराठी तर काही प्रश्न हिंदीमध्ये विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तसेच काही पर्यायी प्रश्नही चुकीचे विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. तरी संबधित प्रश्नाचे गुण देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडे केली आहे.